प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : पारंपरिक मंगळागौर खेळांना आधुनिक मनोरंजनाची जोड देत महिलांच्या उत्साहाला नवे व्यासपीठ देणाऱ्या झी मराठीच्या ‘मंगळागौर स्पर्धा – खेळ पैठणीचा’ मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह, लक्ष्मी मार्केट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक खेळांची रंगत आणि लोकप्रिय कलाकारांची उपस्थिती यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या सोहळ्याला ‘देवमाणूस’ मालिकेतील दुर्गावती स्वामी (फुलाबाई), सोनम म्हासवेकर (लाली) आणि अपर्णा क्षेमकल्याणी (रंजना) या लोकप्रिय कलाकारांची प्रमुख उपस्थिती लाभली. कलाकारांशी संवाद साधण्याची तसेच त्यांच्यासोबत कार्यक्रमाचा आनंद लुटण्याची संधी मिळाल्याने उपस्थित महिलांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
दरम्यान, मंगळागौर स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विजेत्या संघांची घोषणा करण्यात आली. प्रथम क्रमांक – हरिप्रिया मंगळागौर ग्रुप, मिरज, द्वितीय क्रमांक – मौर्या मंगळागौर ग्रुप, म्हैसाळ, तर तृतीय क्रमांक – कुपवाड पूर्व मंगळागौर ग्रुप यांनी पटकावला. विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांसाठी पैठणी, आकर्षक क्रॉकरी गिफ्ट्स तसेच रोख बक्षिसे अशी विविध पारितोषिके ठेवण्यात आली होती. त्यामुळे लकी ड्रॉची घोषणा होत असताना प्रत्येक बक्षिसाबाबत उपस्थितांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळागौर ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा आणि महिलांच्या सांस्कृतिक सहभागाचा अविभाज्य भाग आहे. या परंपरेतील खेळ, गाणी आणि सांघिक सहभागाला व्यासपीठ देत महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करतानाच महिलांना मनोरंजन, मैत्री आणि आनंदाचा अनुभव देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहिला.
या कार्यक्रमाचे आयोजन व निमंत्रक भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, सांगली शहर मा. सौ. स्वातीताई सुशांत खाडे होत्या. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कलाकारांची उपस्थिती आणि कार्यक्रमातील आनंदी वातावरणामुळे ‘खेळ पैठणीचा’ या उपक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेत्या सुमनताई खाडे, भाजपा महिला मोर्चा सांगली शहर प्रभारी प्रमुख मंजिरीताई गाडगीळ, महिला व बालकल्याण विकास सभापती बानू जमादार, माजी महापौर संगीता खोत, नगरसेविका उज्वला कांबळे, योगिता राठोड, रसिका खाडे, जिल्हा परिषद सदस्य मंजुश्री कांबळे, अश्विनी कांबळे यांच्यासह महिला मोर्चाच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, मंडल अध्यक्ष तसेच सर्व आघाडी अध्यक्ष उपस्थित होते.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा ‘मंगळागौर स्पर्धा – खेळ पैठणीचा’ सोहळा मिरज शहरातील महिलांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि पारंपरिक संस्कृतीचा अविस्मरणीय सोहळा ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या