प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : ग्रामपंचायत आरवडे येथे २१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत गावाचे ऐतिहासिक ‘आरवडे’ हे नाव बदलून ‘गोपाळपूर’ करण्याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाला आरवडे गाव नामांतर विरोधी संघर्ष कृती समितीसह ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा निर्णय घाईगडबडीत, बहुसंख्य ग्रामस्थांना विश्वासात न घेता व योग्य प्रक्रिया न पाळता घेण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे.याबाबत गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नामांतराचा ठराव तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.‘आरवडे’ हे नाव केवळ गावाची ओळख नसून त्याला प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा लाभलेला आहे. गावातील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिरालाही प्राचीन परंपरा असल्याने गावाचे नाव बदलल्यास या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला धक्का पोहोचेल, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
इस्कॉन संस्थेचे आचार्य लोकनाथ स्वामी महाराज यांनी आरवडे गावाचे नाव ‘गोपाळपूर’ करण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुढे आल्याचे समितीने नमूद केले आहे.महाराजांविषयी ग्रामस्थांना आदर असला तरी केवळ भावनिक किंवा वैयक्तिक इच्छेच्या आधारे शेकडो वर्षांची गावाची ओळख बदलणे योग्य नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.गावातील विद्यार्थ्यांना अकरावी व पुढील शिक्षणासाठी तासगाव व सांगली येथे जाण्यासाठी पुरेशा बसफेऱ्या उपलब्ध नाहीत.तसेच शेतीसाठी पाणी, रस्ते व वीज यांसारखे मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना ग्रामसभेत या प्रश्नांवर सखोल चर्चा होण्याऐवजी नामांतराचा विषय पुढे आणण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
गावाचे नाव बदलल्यास महसूल अभिलेख,सातबारा उतारे, मतदार यादी, आधार, मालमत्ता कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आरोग्य नोंदी, बँकिंग व अन्य शासकीय कागदपत्रांमध्ये बदल करावा लागणार असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर प्रशासकीय व आर्थिक भार पडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नामांतराच्या निर्णयापूर्वी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक ग्रामसभा घेणे आवश्यक होते. मात्र ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली नसल्याचा दावा समितीने केला आहे. ‘आरवडे’ हे नाव बदलण्यामागे कोणतेही ठोस व सयुक्तिक कारण ग्रामस्थांसमोर मांडण्यात आलेले नाही, असेही निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, इस्कॉन मंदिर परिसराशी संबंधित भागासाठी स्थानिक ओळख म्हणून ‘गोपाळपूर’ हे नाव वापरण्यास ग्रामस्थांचा विरोध नसून, मात्र संपूर्ण आरवडे गावाचे ऐतिहासिक नाव बदलण्यास तीव्र विरोध असल्याची भूमिका समितीने स्पष्ट केली आहे.नामांतराचा ठराव रद्द करून पुन्हा सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत सर्वसमावेशक ग्रामसभा घ्यावी आणि तोपर्यंत नामांतराबाबतची पुढील प्रशासकीय कार्यवाही स्थगित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशाराही आरवडे गाव नामांतर विरोधी संघर्ष कृती समिती व ग्रामस्थांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या