कुपवाड : मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या पती-पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी क्रूरकर्मा फरीद शेख याच्या घरावर अखेर महापालिका प्रशासनाने बुलडोझर चालवून बांधकाम उध्वस्त केले. हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्थानिक हिंदू महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली, असा दावा आंदोलकांनी केला.
स्वातंत्र्यदिनी कुपवाड येथे किरकोळ वादातून फरीद शेख याने मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर या पती-पत्नीवर हातोडा व मटन कापण्याच्या सुरीने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेनंतर हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आक्रमक पवित्रा घेत, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, सरकारी वकिलाची नियुक्ती करावी तसेच आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले.
‘कारवाई करा, अन्यथा आम्हीच घर उध्वस्त करू!’
महापालिकेच्या कारवाईला विलंब होत असल्याने हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि स्थानिक हिंदू महिला आरोपीच्या घराजवळ ठिय्या देऊन बसले. अनेक तास प्रशासनाच्या कारवाईची वाट पाहण्यात आली. कारवाईस विलंब होत असल्याने आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
‘बुलडोझर चालवून कारवाई करा; अन्यथा आम्ही स्वतः फरीद शेखचे घर उध्वस्त करू,’ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यानंतर महापालिका व पोलिस प्रशासनाने बुलडोझर कारवाई करत संबंधित बांधकाम उध्वस्त केले.
कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार
बुलडोझर कारवाई यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापालिकेच्या उपायुक्त सौ. स्मृती पाटील, सचिन सागावकर, नागार्जुन मद्रासी तसेच कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आंदोलकांनी त्यांचे आभार मानले.
कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
यावेळी महापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी श्री. प्रभू यांनी कारवाईसाठी आवश्यक सहकार्य केले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यांच्या भूमिकेमुळे कारवाईला विलंब झाल्याचा दावा करत, या प्रकरणाची चौकशी करून दोष आढळल्यास श्री. प्रभू यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केली.
‘सहा तास आम्ही रस्त्यावर ठाम होतो’ — नितीन शिंदे
हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, “ फरीद शेखच्या घरावर बुलडोझर कारवाई व्हावी यासाठी हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते आणि स्थानिक हिंदू महिला सहा तास घटनास्थळी ठामपणे उभे होते. प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केल्याने संताप वाढत होता. अखेर महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई केली. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आम्ही अभिनंदन करतो.”
‘सरकार हिंदुत्ववादी असतानाही आंदोलन का करावे लागते?’
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राहुल बोळाज म्हणाले, “सरकार हिंदुत्ववादी विचारांचे असतानाही आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते, ही संतापाची बाब आहे. आरोपीला कायद्यानुसार लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे.”
यावेळी हिंदू एकता आंदोलन शहराध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, संजय बापू तांदळे, भूषण गुरव, सुनील तिवले, प्रसाद रिसवडे, गजानन माने, दिग्विजय शिंदे, अनिकेत कुंभार, प्रथमेश मुळे, शंकर माने आदी हिंदू एकता आंदोलन व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते तसेच हिंदू कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या