प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज-पंढरपूर मार्गावर कारवाई करत सुमारे ३०० किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह वाहन व मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मंगेश प्रकाश मोरे (वय ४५, रा. बोरगावडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याकडून ही अमली पदार्थाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज-पंढरपूर मार्गावर सापळा रचून अशोक लेलँड कंपनीच्या कंटेनरची तपासणी केली.
तपासणीदरम्यान कंटेनरच्या डॅशर केबिनमधील कप्प्यात अंदाजे २ किलो वजनाचे १५० पॅकेट आढळून आले. या पॅकेटमध्ये हिरवट काळपट रंगाचा फुलोरा असलेला तयार गांजा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत गांजासह २५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजिव झाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्यासह पोलीस पथकाने कारवाईत सहभाग घेतला.
प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशा राज्यातून आणण्यात आला असून पुढे सांगली जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जात असल्याचे समोर आले आहे. जप्त गांजा नेमका कोणाला विक्री करणार होते, तसेच या तस्करीच्या मागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. गांजा तस्करीच्या या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या