गगनबावडा : पोटाची खळगी भरण्यासाठी समोर पडलेला अन्नाचा घासही जिथे अपुरा पडतो, तिथे कडाक्याच्या थंडीत, वाऱ्यात आणि पावसात उघड्यावर जगणाऱ्या एका निराधार महिलेच्या वाट्याला आलेले जिणे पाहून आज माणुसकीही रडकुंडीला आली आहे. निवडे-साळवण बाजारपेठेतील एस.टी. स्टँड शेजारी आणि एका गॅरेजच्या अंधाऱ्या कोपऱ्यात, मानसिक संतुलन गमावलेली एक महिला आपली भूक भागवण्यासाठी चक्क कच्चं वांगं चावून खाताना दिसली. हे हृदयद्रावक दृश्य पाहून पाषाणहृदयी माणसाच्याही डोळ्यांतून अश्रूंचा पूर आल्याशिवाय राहणार नाही.
एकीकडे आलिशान लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्ये पक्वान्नांची नासाडी करून ते अन्न कचराकुंडीत फेकले जात आहे; तर दुसरीकडे याच समाजात एका अगतिक, उघड्यावर जगणाऱ्या महिलेला पोट भरण्यासाठी कचऱ्यात फेकून दिलेले, कच्चे आणि उष्टे-खरकटे अन्न खावे लागत आहे. ही परिस्थिती आपल्या प्रगत आणि सुसंस्कृत समाजाच्या तोंडावर मारलेली एक जोरदार चपराक आहे.
पैशांचे मूल्यही जिथे हरवले, तिथे हवी आहे फक्त माणुसकी!
आमच्या प्रतिनिधींनी या महिलेची विदारक अवस्था पाहून तिच्या हातात मदतीसाठी काही पैसे ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मानसिक ढळलेल्या त्या माऊलीला त्या कागदी नोटांचे मूल्यच समजले नाही. ती शून्य नजरेने त्या पैशांकडे पाहत राहिली. या एकाच प्रसंगाने हे स्पष्ट केले की, तिला पैशांची गरज नाही, तर तिला गरज आहे अन्न, वस्त्र, निवारा आणि प्रेमाच्या स्पर्शाची!
प्रशासन आणि संस्थांनो, आतातरी जागे व्हा!
गेल्या अनेक दिवसांपासून ही महिला कडाक्याच्या थंडीत, वाऱ्यात आणि पावसाच्या धारा झेलत रस्त्यावरच दिवस काढत आहे. तिच्या या दुर्दशेकडे पाहून प्रत्येक संवेदनशील मनाला वेदना होत आहेत.
तातडीची कारवाई: सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून या निराधार महिलेला तातडीने एखाद्या सुरक्षित अनाथ आश्रमात किंवा निराधार गृहात दाखल करण्याची व्यवस्था करावी.
शासकीय मदत: अशा बेघर आणि मानसिकदृष्ट्या विचलित झालेल्या मानवांचा सांभाळ करण्यासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना सरकारने भरघोस निधी आणि पगारी स्वयंसेवक उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
माणसाला सन्मानाने जगण्याचा हक्क या देशाचे संविधान देते; पण या महिलेच्या नशिबी आलेले हे जिणे पाहून ‘आपण खरोखरच माणूस म्हणून जगण्यास पात्र आहोत का?’ असा प्रश्न निर्माण होतो. आता वेळ गमावण्याची नाही, तर माणुसकीचा हात पुढे करून या निराधार माऊलीच्या आयुष्यात आशेचा किरण पसरवण्याची आहे!
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या