प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाची बैठक समृद्धी मल्टीपर्पज हॉल,तासगाव येथे पार पडली.या बैठकीत उपोषणाला पाठिंबा देण्याबरोबरच आंदोलनाच्या पूर्वतयारीबाबत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ संपूर्ण तासगाव तालुक्यात जनजागृती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.तसेच आंदोलनाच्या नियोजनासाठी तासगाव तालुक्यात समन्वय समिती स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले.यापुढे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सकल मराठा समाजाची बैठक घेऊन समाजातील विविध प्रश्नांवर तसेच आंदोलनाच्या पुढील दिशा व नियोजनावर चर्चा करण्याचेही ठरले.दरम्यान,नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबद्दल कथितरित्या अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ बैठकीत तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला.समाजाच्या महिला व मुलींबद्दल अवमानकारक वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत,अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
बैठकीस तासगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या