प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा तासगाव शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला. या अमानुष घटनेतील आरोपी फरीद शेख याच्यावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी आणि दोष सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.समाजात हिंसक व चुकीच्या प्रवृत्तींना कोणत्याही परिस्थितीत थारा देता कामा नये.अशा कृत्यांना तासगाव शहरातील मुस्लिम समाजाचे कोणतेही समर्थन नसून, शांतता, सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि कायद्याचा सन्मान कायम राहावा, अशी स्पष्ट भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.दरम्यान, कुपवाड दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या तासगाव बंदला तासगाव शहर मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.या संदर्भातील मुस्लिम समाजातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांना देण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते निसार मुल्ला, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष अनवर (भाई) इनामदार, जमीर मुजावर, अशपाक मुल्ला, अल्ताफ मेहत्तर, शमशुद्दीन मुल्ला, शकील सय्यद यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अमानुष कृत्याला धर्म नसतो; दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या