प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : राज्य ज्युनिअर मैदानी निवड व अजिंक्यपद स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा १२७ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. येत्या २७ ते ३० ऑगस्टदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील एस. व्ही. जे. सी. टी. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा रंगणार आहे.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे ८ व ९ ऑगस्ट रोजी ज्युनिअर जिल्हा अजिंक्यपद व निवड मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे राज्यस्तरीय संघासाठी निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी निवड झालेल्या खेळाडूंची घोषणा केली.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये २० वर्षांखालील गटात २७ मुले व २७ मुली, १८ वर्षांखालील गटात १४ मुले व १४ मुली, १६ वर्षांखालील गटात १३ मुले व १० मुली, तर १४ वर्षांखालील गटात ७ मुले व ८ मुलींचा समावेश आहे. विविध वयोगटांतील एकूण १२७ खेळाडू सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
राज्य स्पर्धेसाठी प्रमोद एळवी, संतोष पाटील व ऋषिकेश जाधव यांची संघव्यवस्थापक म्हणून, तर विजयकुमार शिंदे यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपल्या खेळप्रकाराच्या तीन तास आधी चेस्ट नंबर घेणे आवश्यक असल्याचे संघटनेने कळविले आहे.
सांगली जिल्ह्याच्या या भक्कम १२७ खेळाडूंच्या संघाकडून राज्यस्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या