प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहरातील वरचे गल्ली व मस्के वाडा परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शौचालय परिसर तसेच भिलवडी नाका येथील कै. डी. एम. (बापू) पाटील क्रीडांगण परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झाडी-झुडपे वाढली आहेत.त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून,नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाबद्दल स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.याबाबत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तोंडी सूचना व तक्रारी करूनही अद्याप परिसराची स्वच्छता करण्यात आलेली नाही.सार्वजनिक शौचालयाच्या आजूबाजूला साचलेली घाण, वाढलेले गवत व झाडी-झुडपांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तातडीने औषध फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,सार्वजनिक शौचालयात तसेच शौचालया समोरील परिसरात स्ट्रीट लाईटची कोणतीही व्यवस्था नाही.त्यामुळे रात्रीच्या वेळी महिला,लहान मुले व वृद्ध नागरिकांना शौचालयाचा वापर करताना तसेच ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही नागरिकांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे सदर परिसरातील अस्वच्छता तातडीने दूर करून औषध फवारणी करावी,शौचालय परिसरातील वाढलेले गवत व झाडी-झुडपे दोन दिवसांत काढून परिसर स्वच्छ करावा,तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक शौचालयात व शौचालयासमोर कायमस्वरूपी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“दोन दिवसांत मागण्यांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास प्रशासनाविरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी तासगाव शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कदम,विवेक सूर्यवंशी, रोहन लुगडे, महेश इंगवले आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या