सांगली : अपंग सेवा केंद्र, सांगली येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. लतादीदींनी गायलेल्या ‘ये मेरे वतन के लोगो’ या गीताचे सीमा सोनार यांनी सादरीकरण केले.
यानंतर दिव्यांग मुलांनी ‘तेरी मिट्टी में मर जावा’ या गीतावर सिंदूरमध्ये शहीद झालेले तसेच देशासाठी लढणाऱ्या जवानांना समर्पित भावपूर्ण नृत्य सादर केले. या सादरीकरणाने उपस्थितांची मने हेलावली.
योगशिक्षिका मनीषा काळे यांनी संस्थेचा व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. दाते आचल कुलकर्णी यांच्या हस्ते पृथ्वीराज बाबा पाटील यांचा, तर माधवी पटवर्धन यांच्या हस्ते सौ. विजया पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माजी सुभेदार मेजर दिनकर घाटगे यांचा सन्मानपत्र देऊन पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नुकताच भारतीय सैन्यात प्रवेश केलेले साहिल मुलानी यांचाही सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या आधाराने यश मिळविणाऱ्या जिद्दी विद्यार्थ्यांचा विशेष कौतुक सोहळा झाला. अनिश मोरे, शिरसाट, मयूर पोकर, मुग्धा छत्रे आणि दीपक सलगर यांचा सत्कार करण्यात आला. मेजर दिनकर घाटगे व साहिल मुलानी यांनी मनोगत व्यक्त केले.
पृथ्वीराज पाटील व सौ. विजया पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, “अशी संस्था आम्ही कधी पाहिली नाही. संस्थेचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार काढले.
यावेळी गरजू दिव्यांगांना तीन श्रवणयंत्रे, एक व्हीलचेअर, एक फॉल-पिको मशीन आणि एक इलेक्ट्रिकल ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले. संस्थेचे खजिनदार रमेश राठोड यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास शोभा अचल कुलकर्णी, वाय. पी. लेले, डॉ. शेखर इनामदार, रवी पाटील, देशपांडे दाम्पत्य, अलका आटपाडीकर, मनीषा पाटील, ऋता कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रीना राठोड, पूजा पाटील, डॉ. अजित पाटील, तृप्ती हेगडे, पंडित मॅडम, मनीषा काळे, स्नेहल कुलकर्णी, बसू माळी काळे, लक्ष्मण कलाल, अमित चौधरी, महेश गराटे, राजन कामानी, अभिषेक वाघमारे, सूरज वाघमोडे, रूपा वाघमारे व सोनल खांडेकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्षा निर्मला कुलकर्णी यांनी केले.
‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सौ. अर्चना साळुंखे यांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत सादर केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या