प्रतिष्ठा न्यूज
सांगली : येथील मूकबधिर मुलांच्या शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. उदयसिंह विठ्ठल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सामुदायिक कवायतीचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत सांगली राऊंड टेबल ३७७च्या सहकार्याने ई-लर्निंग वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. उदयसिंह पाटील, राऊंड टेबल ३७७चे चेअरमन सागर चव्हाण, व्हाईस चेअरमन रोहन जवर, खजिनदार मयंक शहा व सदस्यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हा वर्ग उपयुक्त ठरणार आहे.
कार्यक्रमात संस्थेचे सचिव चंद्रकांत जगदाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संस्थेचे संचालक ॲड. विलासराव पवार यांनी शाळेची माहिती व प्रास्ताविक केले. शाळेच्या संचालिका डॉ. आशा गाजी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
यावेळी डॉ. आरती गाजी व डॉ. अमित गाजी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व बूट वाटप करण्यात आले. घनश्याम सिंधी यांनी दहा विद्यार्थ्यांना गणवेश दिले. माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले.
ई-लर्निंग वर्गासाठी देणगी व सहकार्य करणाऱ्या सांगली राऊंड टेबल ३७७चे सदस्य, दांडेकर अँड कंपनी, संदीप ट्रेडर्स आणि जगवल्लभ पतसंस्था यांचे मुख्याध्यापक घरपणकर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना गणवेश व बूट उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. आशा गाजी यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा भारती चोपडे, खजिनदार चंद्रकांत पाटील, संचालक दिगंबर टिकारे, डॉ. सी. आर. पाटील, जायंटस ग्रुप ऑफ सांगलीचे अध्यक्ष नितेश पवार, जायंटस सहेली ग्रुपच्या अध्यक्षा शितल पाटील, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या