सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करण्यासाठी व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त श्रीम. संजिता महापात्र (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा व नियोजन बैठक पार पडली.
यंदा १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी महापालिकेने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आगामी वर्षापासून सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्ती, रासायनिक रंग तसेच सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गणेशोत्सवाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची विशेष नियोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांनी विषारी रंगांचा वापर केलेल्या किंवा पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या मूर्तींऐवजी गोमय, शेतमाती अथवा गाळाच्या मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोल व प्लास्टिक शीट्सचा वापर टाळून कागद, पुठ्ठा, कापड यांसारख्या नैसर्गिक व पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृत्रिम फुलांऐवजी नैसर्गिक फुलांचा वापर करण्याबाबतही जनजागृती केली जाणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था
नदी, विहीर व तलाव यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. शहरातील चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या क्षेत्रात मैदाने, उद्याने, मोकळ्या जागा तसेच मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या परिसरात मोठ्या संख्येने कृत्रिम तलाव व शेततळ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीकाठी मानवी साखळी करून निर्माल्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न टाकता त्यासाठी तयार करण्यात आलेल्या मंगल कलशामध्ये जमा करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
पर्यावरणपूरक गणेश मंडळांसाठी स्पर्धा
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांना तसेच उत्कृष्ट देखावे सादर करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विविध आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांनी व गणेश मंडळांनी सहकार्य करावे. तसेच लेझर लाईटचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या बैठकीस आयुक्त श्रीम. संजिता महापात्र, उपायुक्त श्रीम. स्मृती पाटील, उपायुक्त श्रीम. विद्या पाटील, उपायुक्त श्री. पराग कोडगुले, पर्यावरण अभियंता श्री. अजित गुजराथी, मुख्य स्वच्छता अधिकारी याकुब मद्रासी, प्रशासन अधिकारी (शिक्षण विभाग) श्री. प्रकाश खेडकर, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी श्री. विनायक शिंदे यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव आनंददायी, पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करून महापालिका प्रशासनाला नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या