कुपवाड : घरामागे कचरा टाकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून संशयित फरीद अब्दुल शेख याने मनीषा केसरेकर महिलेची चाकूने भोसकून निघृण खून केला होता. तसेच वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. मोहन केसरकर यांचा ही मृत्यू झाला आहे. या घटनेचे कुपवाड शहर परिसरात तीव्र पडसाद उमटले आहेत.
स्थानिक महिला मंडळ, समस्त मुस्लिम समाज समिती आणि कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने घटनेचा निषेध करण्यात आला. संशयित फरीद शेख याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. विघ्नहर्ता कॉलनी व प्रभाग आठमधील असंख्य महिला, संघर्ष समितीचे पदाधिकारी, मुस्लिम समाज समितीचे सदस्य आणि नागरिकांनी कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी नगरसेवक प्रकाश पाटील, विष्णू माने, सनी धोतरे, मुस्ताक रंगरेज, मुहसर मुजावर, आशुतोष धोतरे, अरुण रूपनर, अख्तरहुसेन मुजावर, गोरख व्हनकडे, तानाजी गडदे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहायक पोलिस निरीक्षक घाडगे यांनी पोलिस विभाग केसरेकर कुटुंबीयांसोबत असून, या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास करून आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीकडून त्रास किंवा धमकी मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या