प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती आणि तासगावच्या २४७ वर्षांच्या प्रसिद्ध रथोत्सव परंपरेचे अधिष्ठान असलेल्या श्री गणपती मंदिराचे संस्थापक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन (१७४०-१७९९) यांच्या जीवनकार्यावर आधारित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. २३) तासगाव येथील श्री गणपती मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.सांगली येथील इतिहासप्रेमी व संशोधक महेश कदम यांच्या लेखणीतून साकारलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन मिरज संस्थानचे ‘हिज हायनेस’ श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीमंत माधवराजे पटवर्धन, त्यांच्या पत्नी अनुसयाराजे तसेच पटवर्धन घराण्यातील मान्यवरांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.कार्यक्रमात बोलताना श्रीमंत माधवराजे यांनी परशुरामभाऊंच्या दुर्मिळ युद्धतंत्राचा आणि रणनीतीचा सविस्तर आढावा घेतला.भाऊंच्या जलद हालचाली,अल्प सैन्यबळाचा प्रभावी वापर आणि युद्धातील कौशल्याची परकीयांनीही दखल घेतल्याचे त्यांनी विविध ऐतिहासिक दाखल्यांतून स्पष्ट केले.लेखक महेश कदम यांनी परशुराम भाऊंच्या कार्याचा गेल्या पाच-सहा वर्षांपासून केलेल्या संशोधनातील अनुभव कथन केले. हा ग्रंथ केवळ एका व्यक्तीच्या चरित्राचे लेखन नसून, परशुरामभाऊंसह इतिहासातील असंख्य अनामवीरांच्या कार्याचा शोध घेण्याचा हा प्रारंभ असल्याचे त्यांनी सांगितले.माजी खासदार संजयकाका पाटील यांनी इतिहासातून नवीन पिढीने प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त केली.इतिहासाचे जतन व त्यातून पुढील पिढीला दिशा देण्यासाठी सर्व समाजघटकांनी डोळसपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.तासगावच्या नगराध्यक्ष सौ विजया पाटील यांनी परशुरामभाऊंचा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून उजेडात आणल्याबद्दल पटवर्धन कुटुंबीयांचे आभार मानले.परशुरामभाऊंच्या सातव्या पिढीचे वारसदार श्रीमंत राजेंद्र परशुराम पटवर्धन तासगावकर यांनी प्रदीर्घ काळानंतर भाऊंचे चरित्र प्रकाशित होत असल्याबद्दल समस्त तासगावकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या वतीने मान्यवरांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.ग्रंथाचे लेखक महेश कदम यांचे सहकारी रणजीत चव्हाण व प्रकाशक शिवप्रसाद शेवाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पंडित अनंतशास्त्री जोशी व पंडित प्रज्वल गोसावी यांच्या वेदमंत्रोच्चार आणि देवीप्रशंसा गायनामुळे कार्यक्रमाचे वातावरण भक्तिमय व मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कोळेकर व पल्लवी मिरजकर यांनी केले.आभार प्राचार्य के.एन.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या वीज,ध्वनी,मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी कपिल माळी व अजिंक्य खिचडे यांनी सांभाळली.पंचायतन ट्रस्टच्या विश्वस्त श्रीमंत सौ.सिताराराजे पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली पवनसिंह कुडमल,पंडित अथर्व जोशी,समीर यादव,ओम काकडे, गजानन घाटगे,राजेंद्र पाटिल,प्रतीक पाटिल यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.परशुरामभाऊंच्या आठव्या पिढीचे प्रतिनिधी श्रीमंत राहुल पटवर्धन यांच्या पत्नी सौ मनीषा पटवर्धन व कन्या इशाना यांच्यासह तासगाव शहरातील श्री गणपती भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.शालिनी पॅलेस हॉटेल मालक उदय शेट्टी यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या