प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : शासकीय सेवा मिळवण्यासाठी दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. तलाठी, ग्रामसेवक तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी नेमके कोणत्या दिवशी कोणत्या गावात उपलब्ध असतील, याची माहिती नागरिकांना मिळत नसल्याने अनेकांना काम न होताच माघारी परतावे लागत आहे. नागरिकांची ही गैरसोय थांबवण्यासाठी प्रत्येक गावासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.
गगनबावडा तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमधून दाखले, महसूलविषयक कामे, शेतीची कागदपत्रे, विविध शासकीय योजनांचे लाभ तसेच अन्य कामांसाठी नागरिकांना संबंधित कार्यालयात जावे लागते. मात्र अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे एकापेक्षा अधिक गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो.
दूरवरून प्रवास करून कार्यालयात पोहोचल्यानंतर संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याचे समजल्यास नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. काही वेळा संपूर्ण दिवस वाया जाऊनही काम होत नाही. त्यामुळे प्रवासाचा खर्च, वेळ आणि श्रम वाया जात असून विशेषतः आर्थिकदृष्ट्या सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
गावनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध करण्याची मागणी
तलाठी, ग्रामसेवक आणि इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रत्येक गावासाठी निश्चित दिवस व वेळ ठरवून त्याचे वेळापत्रक जाहीर करावे. हे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि गावातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावे. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना अधिकारी उपलब्धतेची माहिती देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
बायोमेट्रिक हजेरीचीही मागणी
तालुक्यातील शासकीय कार्यालयांसह शाळा व महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अचूक नोंद राहून कार्यालयीन शिस्त वाढण्यास मदत होईल. बायोमेट्रिक हजेरीचा उद्देश केवळ कारवाई करणे नसून प्रशासन अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख करणे हा असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“दुर्गम गावांमधील नागरिकांना दाखले, महसूलविषयक कामे, शेतीची कागदपत्रे आणि विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा संबंधित कार्यालयांत यावे लागते. मात्र अधिकारी उपलब्ध नसल्यास नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यामुळे गावनिहाय अधिकारी उपलब्धतेचे वेळापत्रक जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.”
— विशाल पडवळ, सुनील पडवळ, विजय वरेकर, कृष्णा यादव
सामाजिक कार्यकर्ते
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या