प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली यांच्या वतीने महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा व ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता लक्ष्मी मार्केट, मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. महिलांच्या कलागुणांना, उत्साहाला आणि पारंपारीक संस्कृतीला व्यासपीठ मिळावे, तसेच मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचे जतन व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात विविध मंगळागौर स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळ घेण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांसाठी पैठणी, आकर्षक क्रॉकरी गिफ्ट्स तसेच रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सहभागी महिलांसाठी मनोरंजनासोबतच पारंपरिक खेळांचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सांगली तथा एमटीडीके शैक्षणिक संकुल च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वातीताई सुशांत खाडे यांचे निमंत्रण असून, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश विनामूल्य असून, मिरज परिसरातील महिलांसाठी हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय महिला कलाकारांची विशेष उपस्थिती. या कलाकारांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार असून, महिलांना आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मिरज परिसरातील महिलांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या