सांगली प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांना एकाच व्यासपीठावर आणत पत्रकारिता क्षेत्रातील बदल, प्रश्न आणि भविष्यातील वाटचालीवर विचारमंथन घडवून आणणारा मराठी पत्रकार परिषदेचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी सांगलीत होत आहे. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून ५०० हून अधिक पत्रकार, संपादक आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील कृष्णा मॅरेज हॉलमध्ये दुपारी मुख्य मेळावा होणार आहे. या निमित्ताने सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून पत्रकारिता कार्यशाळा, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, मान्यवरांचे मार्गदर्शन, पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा तसेच उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पत्रकारांचा गौरव असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
मेळाव्याची सुरुवात सकाळी १० वाजता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादनाने होईल. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या सहकार्याने राज्यस्तरीय पत्रकारिता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पत्रकारितेचे बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, तंत्रज्ञानामुळे माध्यम क्षेत्रात होत असलेले बदल आणि पत्रकारांसमोरील नव्या आव्हानांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी ११ वाजता मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. पत्रकारांच्या विविध प्रश्नांसह संघटनात्मक बाबी आणि पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्षांकडे पदभार
दुपारी २ वाजता पश्चिम महाराष्ट्र पत्रकार मेळाव्याला सुरुवात होईल. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शन यावेळी होणार आहे. विशेष म्हणजे मराठी पत्रकार परिषदेचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार सोपविण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रमही यावेळी होणार आहे. त्यामुळे संघटनात्मकदृष्ट्या या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सांगलीच्या मातीतून राज्यभर ठसा उमटविणाऱ्या पत्रकारांचा सन्मान
सांगली जिल्ह्याच्या मातीतून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत राज्यभर आपला ठसा उमटविणाऱ्या पत्रकार आणि संपादकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्याशी नाळ कायम ठेवत विविध माध्यमांतून पत्रकारितेला योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव या निमित्ताने करण्यात येणार आहे.
तसेच मुंबई प्रेस क्लबच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पत्रकारांच्या संघाचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव हा मेळाव्याचा महत्त्वाचा आकर्षणबिंदू ठरणार आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन
पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासोबतच बदलत्या पत्रकारितेच्या प्रवाहांवर संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून केला जाणार आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता विस्तार, पत्रकारांचे हक्क आणि संरक्षण, बदलती कार्यपद्धती, माध्यमांसमोरील आर्थिक व व्यावसायिक आव्हाने तसेच भविष्यातील पत्रकारितेची दिशा या विषयांवरही विचारमंथन होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संवाद, समन्वय आणि संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या