प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वयस्कर आजी-आजोबांना मोटारसायकलवरून घरी सोडण्याचा बहाणा करून निर्जनस्थळी नेऊन लुटणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मारुती बयाजी कोटे (वय ४७, रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने आरोपीला २४ ऑगस्ट २०२६ रोजी कुपवाड येथील चाणक्य चौक परिसरातून ताब्यात घेतले.
बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडविण्याचा बहाणा
१६ ऑगस्ट रोजी मिरज तालुक्यातील बेळकी येथे एक वयस्कर महिला रणदिवे किराणा स्टोअर्ससमोर थांबली असताना आरोपी मोटारसायकलवरून तेथे आला. “मी पुजारी आहे. जवळच बाळूमामाची मेंढरे आली आहेत. तुम्हाला दर्शन करून पुन्हा घरी आणून सोडतो,” असे सांगून त्याने महिलेला मोटारसायकलवर बसवले.
त्यानंतर महिलेला अनोळखी ठिकाणी नेऊन बोलण्यात गुंतवून तिच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ हिसडा मारून काढून घेतली आणि मोटारसायकलवरून फरार झाला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चाणक्य चौक परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या मारुती कोटेला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केल्यानंतर त्याने बेळकी येथील चोरीची कबुली दिली.
सहा महिन्यांपासून आजी-आजोबांना बनवत होता लक्ष्य
पोलिस कस्टडीदरम्यान केलेल्या तपासात आरोपीने मागील सुमारे सहा महिन्यांपासून जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये बसची वाट पाहत असलेल्या वयस्कर आजी-आजोबांना लक्ष्य केल्याची कबुली दिली.
मोटारसायकलवरून घरी सोडण्याचा बहाणा करून त्यांना निर्जनस्थळी नेणे, तसेच काही वयस्कर व्यक्तींना दारू पाजून बेशुद्ध केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटणे, अशा पद्धतीने त्याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरी केलेले दागिने सोनारांना विकल्याचीही माहिती आरोपीने पोलिसांना दिली.
क्राईम अभिलेख तपासल्यानंतर मिरज ग्रामीण, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण ८ गुन्हे उघडकीस आले.
१४ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपीकडून ९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, किंमत १३ लाख ३५ हजार रुपये, तसेच १ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल, असा एकूण १४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त सोन्याच्या दागिन्यांमध्ये मणीमंगळसूत्र, बोरमाळ, कानातील कुंडले, कर्णफुले, झुमके, कानातील साखळ्या, बदाम, बुगड्या आदी दागिन्यांचा समावेश आहे.
आठ गुन्हे उघड
तपासात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक, जत पोलीस ठाण्यातील तीन, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील एक आणि आटपाडी पोलीस ठाण्यातील तीन, असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
मारुती कोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कर्नाटक राज्यातही जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्यांचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली करीत आहेत.
कारवाईतील पोलीस अधिकारी व कर्मचारी
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ सुभाष सूर्यवंशी, अमित परिट, पोहेकॉ सोमनाथ गुंडे, अनिल कोळेकर, नागेश खरात, अमीर फकीर, संदीप नलावडे, मोतीराम खोत, सागर लवटे, अमर नरळे, प्रकाश पाटील, दरिबा बंडगर, सतीश माने, सागर टिंगरे, राजाराम मुळे, संदीप गुरव, उदय माळी, पोको विक्रम खोत, विनायक सुतार, पोशि करण परदेशी, अजय पाटील, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या