मायणी : मायणी परिसरातील एक इंचही जमीन शक्तिपीठ महामार्गासाठी जाऊ देणार नाही, असा निर्धार शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे लढवय्ये नेते अँड. दिपक लाड यांनी व्यक्त केला. मायणी शिंदेवाडा येथे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आयोजित शेतकऱ्यांच्या संवाद बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला हजारो शेतकरी व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मायणी परिसर हा समृद्ध असून येथील शेती सुपीक व कसदार आहे. या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात असतील आणि त्यांचे जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल, तर संघर्ष समितीच्या वतीने या परिसरात महामार्गाला तीव्र व आक्रमक विरोध केला जाईल, असा इशारा अँड. दिपक लाड यांनी दिला.
मायणी परिसरातील शेतकऱ्यांची ही पहिली संवाद बैठक असून, बैठकीत शेतकरी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात प्रचंड आक्रमक असल्याचे दिसून आले. हजारो शेतकरी व माता-भगिनींची उपस्थिती हीच या विरोधाची तीव्रता दर्शवते. एवढा मोठा विरोध असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नाही, हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.
“मायणी परिसर हा सातारा प्रतिसरकारचा भाग आहे. सरकारकडे पोलीस यंत्रणा असली तरी याच मातीत तुफान सेनेने ब्रिटिशांच्या सत्तेची मस्ती उतरवली होती. आज जर सरकार शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शक्तिपीठ महामार्ग लादणार असेल, तर सरकारच्या सत्तेची मस्ती देखील मायणीच्या याच भूमीतून उतरवली जाईल,” अशी आक्रमक भूमिका अँड. दिपक लाड यांनी व्यक्त केली.
पुढील काही दिवसांत मायणी परिसरात शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र केली जाईल, असेही अँड. दिपक लाड यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्वाभिमानीचे राज्य कार्यकारणीचे नेते अनिल पवार, डॉ. विकास देशमुख, हेमंत देशमुख, मायणीचे सरपंच रणजित माने, चंद्रकांत चव्हाण, सुरेखा जाधव, विनोद निकम, मनोज निकम, अक्षय सूर्यवंशी, संताजी जगताप, रामभाऊ शिंदे, किसन रामराव शिंदे, किसन बरकडे, सचिन शिंदे, आर्यन शिंदे, अविनाश शिंदे, प्रकाश शिंदे, विश्वजित शिंदे, दत्ता शिंदे, यशवंत शिंदे, शिवलिंग शिंदे,सुनील भिसे, मनोज भिसे, वडाचा मळा येथील नितीन माने, रोहित जाधव, शैलजा शिंदे, संगीता शिंदे, शोभा शिंदे, कोमल शिंदे, अश्विनी शिंदे, लाडबाई शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी व माता-भगिनी उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या