प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :नागाला पकडल्यानंतर त्याला अधिवासात न सोडता प्लास्टिकच्या बरणीत ठेवून त्याच्याशी खेळ करणे अंजनी येथील सर्पमित्र राहुल पाटील यांच्या जीवावर बेतले.नागाने अंगठ्याला दंश केल्यानंतर उपचाराकडे झालेल्या दुर्लक्षामुळे विष शरीरात वेगाने पसरले आणि अखेर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेने अंजनीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राहुल पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र म्हणून कार्यरत होते.सोमवारी त्यांनी एका घरातून नाग पकडला होता.मात्र,नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याऐवजी प्लास्टिकच्या बरणीत ठेवण्यात आले. त्यानंतर नागासोबत खेळ करत असताना त्याने अचानक राहुल यांच्या हाताच्या अंगठ्याला जोरदार दंश केला.
सर्पदंश झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक असताना सुरुवातीला या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष झाले.परिणामी विष शरीरात वेगाने पसरत गेले आणि राहुल यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली.
दरम्यान,त्यांना सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.त्यांची गंभीर अवस्था लक्षात येताच वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋतुजा कुंभार आणि रुग्णवाहिका चालक योगेश काटे यांनी तत्परता दाखवली.नातेवाईक येण्यास विलंब होत असल्याने वेळ न दवडता त्यांनी अत्यंत गंभीर अवस्थेतील राहुल यांना नातेवाईकांशिवायच पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल केले.मिरज येथील डॉक्टरांनी राहुल यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र,शरीरात विष मोठ्या प्रमाणात पसरल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.या घटनेमुळे सर्पमित्रांनी तसेच नागरिकांनी सापांसोबत कोणत्याही प्रकारचे स्टंट अथवा खेळ करू नयेत,असा गंभीर संदेश पुढे आला आहे.सर्पदंश झाल्यास वेळ न दवडता तातडीने शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या