प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :शहरासह मळेभागातील रस्त्यांची सततच्या पावसामुळे झालेली प्रचंड दुरवस्था अखेर पालिकेच्या दुरुस्ती मोहिमेमुळे सुधारण्याच्या मार्गावर आली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे मुजविण्याचे काम तसेच मळेभागातील खराब रस्त्यांवर मुरूम टाकण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे.त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि विशेषतः महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.सततच्या पावसामुळे तासगाव शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले होते. मळेभागातील रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झाली होती.खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघातही घडले होते.विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार खड्डे बुजवून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली जात होती.दोन दिवसांपूर्वी माजी खासदार संजयकाका पाटील यांनीही नागरिकांच्या मागणीची दखल घेत,प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.या पार्श्वभूमीवर पालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे मुजविण्याची मोहीम हाती घेतली असून,मळेभागातही मुरूम टाकण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून,पालिका प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी सुरू झालेल्या या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला,तरी उर्वरित खराब रस्त्यांचीही तातडीने दुरुस्ती करून शहर आणि मळेभाग पूर्णपणे खड्डेमुक्त करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या