बागलकोट : लोकसंख्येने कमी असला तरी भावसार क्षत्रिय समाजातील नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा, सन्मानाची भावना आणि परस्परांना मदत करण्याचे क्षात्रगुण रुजलेले आहेत, असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य नारायणसा भांडगे यांनी केले.
नवनगरातील सेक्टर क्रमांक 50 येथे भावसार क्षत्रिय समाजाच्या अंबाभवानी मंदिर परिसरात सुमारे 2 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन समाज भवनाचे उद्घाटन, चांदीच्या उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना, देवीला चांदीची प्रभावळ अर्पण आणि कळसारोहण कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी भांडगे बोलत होते.
देवीच्या चांदीच्या मूर्तीची बागलकोट शहरातून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. ही मिरवणूक विराट हिंदू संमेलनालाही मागे टाकणारी होती. सर्व क्षत्रिय समाजबांधवांनी एकजुटीने सहभागी होणे विशेष उल्लेखनीय असल्याचे भांडगे यांनी सांगितले.
जुन्या बागलकोटमधील मंदिराच्या परिसरातच आपले बालपण गेले असल्याची आठवण सांगताना भांडगे यांनी मंदिराच्या विकासासाठी आगामी काळात अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पंढरपूरचे ह. भ. प. श्री प्रभाकर बुवा बोधले महाराज म्हणाले की, गेल्या काही काळात पाच राज्यांत विविध समाजांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. मात्र, भावसार क्षत्रिय समाजात दिसणारी एकजूट अन्यत्र कुठेही पाहायला मिळाली नाही.
चरंतीमठाचे प्रभू स्वामीजी म्हणाले की, महिलांचा सन्मान आणि त्यांची आराधना करण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आली आहे. त्याचप्रमाणे देवीच्या आराधनेलाही विशेष महत्त्व आहे. समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने सुरू राहिले पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समाजाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या भावसार क्षत्रिय समाजातील पदाधिकारी, समाजबांधव तसेच युवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
गंगा आरतीत शिवतांडवाची भव्यता
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री हुबळी येथील शिवराज सुलाखे यांच्या पथकातर्फे गंगा आरती व मनमोहक शिवनृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पारंपरिक वाद्यांचा निनाद, भक्तिगीते आणि भगवान शिवाच्या विविध भावमुद्रांसह सादर करण्यात आलेल्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शिवतांडवाची भव्यता प्रतिबिंबित करणाऱ्या या कलाविष्काराने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
गंगामातेला आरती करण्यात आली, त्यावेळी मंदिर परिसरात आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. शिवराज सुलाखे यांच्या पथकातील कलाकारांच्या शिस्तबद्ध व मनोहारी सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले. बागलकोट शहरात अशा प्रकारची गंगा आरती व शिवनृत्याचा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
350 बालकांचे उपनयन; धर्मबोध
कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील सुमारे 350 बालकांचे पारंपरिक पद्धतीने उपनयन संस्कार प्रभाकर बुवा बोधले महाराज यांच्या सान्निध्यात करण्यात आले. यावेळी बालकांना धर्माचे आणि संस्कारांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
विविध होम-हवन तसेच धार्मिक विधी-विधाने भक्तिमय वातावरणात पार पडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या