शिराळा प्रतिनिधी : शिराळा पोलिस ठाणे हद्दीतील मांगले गावात पत्नीचा खून करणाऱ्या आरोपी मंगेश चंद्रकांत कांबळे यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीस दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
२७ मार्च २०२५ रोजी आरोपीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे हिचा गळा ओढणीने आवळून खून केला होता. ही घटना आरोपीचा मुलगा शिवम कांबळे याने प्रत्यक्ष पाहिली होती. आरोपीने मृतदेह पत्र्याच्या पेटीत ठेवून खोलीला कुलूप लावून घर सोडले होते.
सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. सतीश विश्वास केकणीस यांनी जोरदार युक्तिवाद केला. या खटल्यात फिर्यादी रंजना अर्जुन चांदणे (मयताची आई), प्रत्यक्षदर्शी शिवम कांबळे, पंच, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे व डॉ. अनिरुद्ध काकडे तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
जिल्हा न्यायाधीश श्री. देविदास एच. केळूसकर यांच्या कोर्टात सुनावणी होऊन आरोपी दोषी ठरला. पत्नीच्या आयुष्याची जबाबदारी असताना पतीनेच तिचा खून करणे हे नातेसंबंधाला काळीमा फासणारे कृत्य असल्याचे नमूद करून न्यायालयाने कठोर शिक्षा दिली.
या खटल्यात पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मुद्दसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनंदा निकम व इतर पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या