प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ शांततामय, सुव्यवस्थित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. गणेश मंडळांना विविध परवानग्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये ‘एक खिडकी’ परवानगी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही सुविधा १ सप्टेंबर २०२६ पासून कार्यान्वित होणार आहे.
महापालिका आयुक्त श्रीमती संजीता महापात्रा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. मंडप, कमान, स्टेज आदींसाठीचे अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची छाननी, जागेची पाहणी, शुल्क आकारणी व भरणा तसेच आवश्यक ना-हरकत दाखले व परवानग्यांची कार्यवाही एकाच ठिकाणी समन्वयाने केली जाणार आहे.
चारही प्रभाग समित्यांमध्ये केंद्रे
प्रभाग समिती क्र. १ साठी मनपा मुख्यालय इमारत, सांगली, प्रभाग समिती क्र. २ साठी विश्रामबाग गणपती मंदिरामागे, सांगली, प्रभाग समिती क्र. ३ साठी कुपवाड विभागीय कार्यालय आणि प्रभाग समिती क्र. ४ साठी मिरज विभागीय कार्यालय येथे ‘एक खिडकी’ केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
या केंद्रांवर महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत आवश्यकतेनुसार पोलीस, वाहतूक पोलीस आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे संबंधित अधिकारी-कर्मचारी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे पाठपुरावा करण्याची गरज भासणार नाही.
२४ तासांत परवानगी देण्याचे नियोजन
गणेश मंडळांकडून प्राप्त अर्जांची संबंधित विभागाकडून छाननी करून आवश्यक असल्यास जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. नियमानुसार शुल्क निश्चित करून ते भरल्यानंतर अंतिम परवानगी देण्यात येणार आहे. प्राप्त अर्ज शक्यतो तत्काळ आणि जास्तीत जास्त २४ तासांच्या आत निकाली काढण्याचे निर्देश प्रशासनाने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
परवानगी प्रक्रियेत अनावश्यक विलंब होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दररोज आढावा घेतला जाणार आहे. प्राप्त अर्ज, निर्गमित परवाने तसेच मंडप आणि कमानींच्या परवानग्यांची स्वतंत्र नोंद ठेवून त्याचा दैनंदिन अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार आहे.
कायदा-सुव्यवस्था आणि वाहतुकीला प्राधान्य
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने मंडप, कमानी आणि मिरवणूक मार्गांबाबत कायदा-सुव्यवस्था व वाहतूक सुरळीत ठेवण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेशी समन्वय साधूनच परवानगी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
तसेच मंडप व विद्युत रोषणाईसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार असून, विद्युत जोडणी व सुरक्षेच्या नियमांचे पालन करूनच आवश्यक ना-हरकत व परवानगी देण्यात येणार आहे.
मंडळांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळावी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे व माहिती पूर्ण स्वरूपात सादर करावी. मंडप, कमान, स्टेज किंवा अन्य संरचना उभारण्यापूर्वी महापालिकेची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळून १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘एक खिडकी’ सुविधेचा लाभ घेऊन मंडळांनी वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याने नियमांचे पालन करून उत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या