प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: आगामी गणेशोत्सव उत्साहात, शांततेत, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडण्यासाठी तासगाव नगरपरिषदेने कंबर कसली असून, शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्ष सौ. विजया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १) पार पडली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.तासगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध मंडळांकडून गणेशमूर्ती प्रतिष्ठापना, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर उत्सव काळात मंडळांना येणाऱ्या विविध अडचणी आणि नगरपरिषदेमार्फत उपलब्ध करून देता येणाऱ्या सुविधांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.गणेश मंडळांना मंडप उभारणीसाठी आवश्यक असणारी परवानगी मोफत देण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.त्यामुळे मंडळांना मोठा दिलासा मिळणार असून, उत्सवाच्या तयारीला अधिक वेग येणार आहे. तसेच गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसादासाठी आवश्यक असणारे पाणी टँकर नगरपरिषदेमार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात फुलांचे निर्माल्य जमा होते. हे निर्माल्य रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पडून राहू नये, तसेच शहरातील स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी नगरपरिषदेकडून स्वतंत्र निर्माल्य संकलन वाहनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंडळांनी निर्माल्य या वाहनातच जमा करून नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष सौ. विजया पाटील यांनी गणेशोत्सव काळात शहरातील नागरिक, गणेश मंडळे आणि नगरपरिषद यांच्यात समन्वय राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्यासाठी नगरपरिषदेकडून गणेश मंडळांना आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.दरम्यान, उत्सव काळातील स्वच्छता, निर्माल्य संकलन तसेच नगरपरिषदेच्या इतर व्यवस्थेबाबत मंडळांनी आवश्यक त्या सूचनांचे पालन करावे आणि शहराची स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.या बैठकीस उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान, गटनेते सतीश लिंबळे, नगरसेवक अनिल कुत्ते, नगरसेवक संदीप सावंत, माजी नगराध्यक्ष बाबासो पाटील, इतर नगरसेवक तसेच तासगाव शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने घेतलेल्या या निर्णयांमुळे मंडळांना सुविधा मिळणार असून, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उत्सवाला देखील चालना मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या