प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर.पाटील (आबा) यांच्या तासगाव शहरातील मार्केट यार्डसमोरील पुतळ्यासमोर सुरू असलेले वाईन शॉप हटविण्याचा ठराव पालिकेने करावा,अशी जोरदार मागणी उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान यांनी काल झालेल्या पालिका बैठकीत केली. या मागणीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून,संबंधित दुकान मालकाची आबा कुटुंबाशी पूर्वीपासूनची जवळीक असल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मात्र ‘विरोध करायचा की समर्थन द्यायचे?’ अशी राजकीय कोंडी झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.आर.आर.आबा हे राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी व्यसनमुक्ती,डान्सबारबंदी, मटका-जुगारबंदी यांसारखे निर्णय घेत सामाजिक हिताला प्राधान्य दिले.तरुण पिढी व्यसनापासून दूर राहावी आणि समाजाला नवी दिशा मिळावी, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. मात्र,ज्या नेत्याने व्यसनमुक्तीचा संदेश दिला, त्यांच्याच पुतळ्यासमोर वाईन शॉपचें दुकान सुरू असल्याचे चित्र विसंगत असल्याचा मुद्दा पैलवान यांनी बैठकीत उपस्थित केला.“आर.आर.आबांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत महाराष्ट्राला नवी दिशा दिली.मात्र,त्यांच्याच पुतळ्यासमोर वाईन शॉपचें दुकान सुरू आहे.दुकानातून खरेदी केल्यानंतर काही जण पुतळ्याच्या परिसरातील कट्ट्यावर बसून मद्यपान करतात.त्यामुळे परिसराच्या सामाजिक वातावरणावर परिणाम होत आहे,” असे पैलवान यांनी सांगितले.दारू खरेदीसाठी दुकानासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच या प्रकारावर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.आर.आर.पाटील यांच्या पुतळ्यासाठी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली होती.परिसराचे सुशोभीकरण आणि स्वच्छतेसाठी तब्बल १६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.मात्र, पुतळ्यासमोरच वाईन शॉप असल्याने या परिसराच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे पैलवान यांनी स्पष्ट केले.हे चित्र आर.आर.आबांच्या विचारांना आणि सामाजिक कार्याला अजिबात शोभणारे नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
*आबा घराण्याशी निष्ठा की आबांच्या विचारांना पाठिंबा?
दरम्यान,या मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसमोर नवा राजकीय पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे.संबंधित दारू दुकानाशी निगडित व्यक्ती पहिल्यापासूनच आबा घराण्याशी एकनिष्ठ असल्याचे बोलले जाते.त्यामुळे दारू दुकान हटविण्याच्या ठरावाला विरोध करायचा की प्रसाद पैलवान यांच्या मागणीला समर्थन द्यायचे,असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसमोर उभा राहिल्याची चर्चा शहरात सुरू आहे.आबांच्या पुतळ्यासमोरील दारू दुकान हटविण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक नेमकी कोणती भूमिका घेतात,याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे. आबांच्या विचारांना साथ की दुकानाला पाठिंबा? याचे उत्तर आगामी काळात पालिकेच्या राजकीय पटलावर स्पष्ट होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या