सांगली: दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था, सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल, मिरज येथील विद्यार्थ्यांनी सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयास क्षेत्रभेट देत पोलीस विभागाच्या विविध कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. पुस्तकी ज्ञानासोबतच पोलिसांची कार्यपद्धती, कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि समाजातील महत्त्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांना समजावी, या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याध्यापिका संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही क्षेत्रभेट घेण्यात आली.
क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोलीस कंट्रोल रूम, डायल ११२ आणि सायबर विभागास भेट देऊन या विभागांच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती जाणून घेतली. आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ ची भूमिका, नागरिकांना तातडीने उपलब्ध होणारी पोलीस मदत, नियंत्रण कक्षातून होणारे समन्वयाचे काम तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलिसांच्या ब्रीदवाक्याचा अर्थ आणि त्यामागील कर्तव्यभावना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत नसून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र तत्पर असते, याची जाणीव विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीतून झाली.
तसेच यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षक आणि विद्यार्थिनींनी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सुहास देशमुख व त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. या उपक्रमातून पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील स्नेहाचे व विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले.
विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत विविध प्रश्न विचारले. प्रत्यक्ष पोलीस यंत्रणेचे कामकाज जवळून पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये कायदा, शिस्त, नागरिकांची सुरक्षितता, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत जागरूकता निर्माण झाली.
या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर (नियंत्रण/वायरलेस कक्ष), सहायक पोलीस निरीक्षक अनिता मेणकर (डायल ११२), सहायक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे (सायबर), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे (११२), पोलीस शिंदे (छायाचित्रकार), पोलीस प्रशिक्षक समीर परदेशी, पोलीस हवालदार प्रशांत कोळी, पोलीस हवालदार करण परदेशी तसेच महिला पोलीस अंजली शिकलगार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, अनुभवसमृद्ध आणि प्रेरणादायी ठरली. शिक्षण हे केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समाजव्यवस्था समजावी, या दृष्टीने खाडे स्कूलचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या