प्रतिष्ठा न्यूज दिपक शिंत्रे
विजयपूर : शहरातील तासबावडी परिसरात गणेश विसर्जनासाठी कायमस्वरूपी 30×80 फूट आकाराचे कुंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त विजयकुमार मेक्कळकी यांना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कडक सूचना दिल्यानंतर त्यांनी कुंडाचा आकार वाढविण्यास सहमती दर्शविल्याची माहिती आमदार यत्नाळ यांनी दिली.
आमदार यत्नाळ यांनी महापालिका आयुक्तांना बोलावून तासबावडी परिसरातील गणेश विसर्जनाच्या प्रश्नावर चर्चा केली. तासबावडी येथे अनेक वर्षांपासून कुंभपूजा, मरगम्मा देवी यात्रेसाठी मडीचे पाणी आणणे तसेच गणेश विसर्जनाची परंपरा सुरू आहे. हिंदूंच्या पवित्र सणाच्या काळात विनाकारण गोंधळ निर्माण करू नये, असे सांगत कुंडाचा आकार कमी केल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
गणेश मंडळे आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन तासबावडी परिसरात 30×80 फूट आकाराचे कायमस्वरूपी विसर्जन कुंड उभारणे आवश्यक असल्याचे यत्नाळ यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तासबावडी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी असलेल्या पादचारी मार्गाची रुंदी काही प्रमाणात कमी करून विसर्जन कुंडाची लांबी व रुंदी वाढविण्याची सूचना केली. यास महापालिका आयुक्तांनी सहमती दर्शवून कुंड मोठे करण्याचे आश्वासन दिले.
*30×30 फूट आकाराच्या कुंडाचा प्रस्ताव रद्द*
तासबावडीजवळ गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेली गणेश विसर्जनाची परंपरा बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार यत्नाळ यांनी केला. याचाच एक भाग म्हणून यंदा केवळ 30×30 फूट आकाराचे छोटे कृत्रिम कुंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या विषयावर गेल्या काही दिवसांपासून विनाकारण गोंधळ निर्माण केला जात होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्तांनी आमदार यत्नाळ यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत तासबावडीजवळील श्री गणेश विसर्जनाची परंपरा बंद करू नये, अशी मागणी केली होती.
त्यानंतर आमदारांनी तातडीने महापालिका आयुक्तांना बोलावून चर्चा केली तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही या विषयाची माहिती दिली. परिणामी, 30×30 ऐवजी 30×80 फूट आकाराचे कायमस्वरूपी कुंड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, छोट्या तसेच मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
गणेशभक्तांनी कोणतीही चिंता करू नये. विनाकारण गोंधळ निर्माण करणाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या