गगनबावडा : गगनबावडा तालुका विकास कार्यकारी सहकारी ग्रामउद्योग संघ मर्यादितच्या कार्यालयासाठी कायमस्वरूपी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती प्रशासनाला अधिकृत निवेदन सादर केले. पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी यांना भेटून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
अशी आहे बातमी सविस्तर:
५२ वर्षांची प्रदीर्घ परंपरा:
या संस्थेची स्थापना ३० ऑगस्ट १९७२ रोजी झाली आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ ही संस्था सहकारी तत्त्वावर तालुक्यातील बारा बलुतेदार आणि कारागिरांच्या हितासाठी निरंतर कार्यरत आहे.
भाड्याच्या जागेत कामकाज:
सध्या संस्थेचे कार्यालय एका खाजगी मालकीच्या जागेत भाडेतत्त्वावर सुरू असून, यामुळे कामाकाजात अनेक अडचणी येत आहेत.
पंचायत समिती आवारात जागेची मागणी: तालुक्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या संस्थेचे कार्यालय पंचायत समितीच्या मुख्य इमारतीमध्ये किंवा तिच्या आवारात असणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे कारागीर आणि ग्रामस्थांना संपर्क साधणे सोयीचे ठरेल, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
पूर्वीच्या पत्रव्यवहाराची आठवण:
यापूर्वीही जागेबाबत प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. आता तरी गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार विनंती करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती:
निवेदन देताना सभापती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, प्रकाश देसाई, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, विनायक सनगर आणि एस. के. पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनावर गगनबावडा तालुका विविध कार्यकारी ग्रामउद्योग संघ मर्यादितचे चेअरमन व सचिव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या