प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 31 : साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर साठेबाजी रोखण्यासाठी आणि बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्रीय व जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने सांगली शहरातील विविध ठिकाणी अचानक छापे टाकून साखरेच्या साठ्याची तपासणी केली. गणपती पेठ तसेच मार्केट यार्ड परिसरातील दुकाने व गोदामांची पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान नियमानुसार कोठेही चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा आढळून आला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यापूर्वीही सांगली व मिरज शहरातील विविध ठिकाणी साखरेच्या साठ्याची तपासणी करण्यात आली आहे. या संयुक्त पथकामध्ये एफसीआयचे व्यवस्थापक जन्मजय सिंग, फूड अॅण्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशनचे सहाय्यक संचालक योगेश्वरुरु बोया, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलूके, साखर विभागाचे लेखापरीक्षक शीतल चौथे आणि पुरवठा निरीक्षक राजू कदम यांचा समावेश होता.
प्रशासनाकडून सुरू असलेल्या या सक्त तपासण्यांच्या अनुषंगाने बाजारातील साखरेचे वाढलेले दर आता कमी झालेले आहेत. असे असले तरी, साठेबाजांवर वचक कायम ठेवण्यासाठी आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ही तपासणी मोहीम अशीच यापुढेही सतत सुरू राहणार असल्याचे पुरवठा विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रत्येक शुक्रवारी साखरेच्या साठ्याची माहिती देणे बंधनकारक
सर्व साखर व्यापारी व गोदाम चालकांनी प्रत्येक शुक्रवारी शासनाच्या पोर्टलवर साखरेची आवक, विक्री आणि सद्यस्थितीतील साठ्याची माहिती देणे बंधनकारक (सक्तीचे) करण्यात आले आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळून आल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा पुरवठा प्रशासनाने दिला आहे.

साखरेचे दर आता घटले आहेत.साठेबाजावर सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. परंतु प्रश्न हा आहे की, मुळात साखरेचे दर अचानक वाढलेच कसे? बरं या दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही मग या दरवाढीमुळे नेमके कुणाचे आणि किती जणांचे उखळ पांढरे झाले हे कळेल का.मिडियाने फाफटपसारा सांगण्यापेक्षा या बद्दल काही संशोधन करावे.
उत्तर द्याहटवा