गगनबावडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून गगनगिरी मठाजवळील दरीच्या टोकावर आत्महत्या करण्यासाठी उभ्या असलेल्या एका ४० वर्षीय तरुणाचे प्राण वाचवण्यात गगनबावडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांची तत्परता, व्हॉट्सअॅप फोटोवरून घेतलेला शोध आणि ऐनवेळी दाखवलेले प्रसंगावधान यामुळे एका वैफल्यग्रस्त नागरिकाला नवीन जीवन मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ढेकु साजगाव (ता. खालापूर, जि. रायगड) येथील रहिवासी रोहिदास मारुती पाटील (वय ४०) हे कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवण्यासाठी गगनबावडा येथील गगनगिरी मठाच्या परिसरात आले होते. त्यांनी आपल्या मोबाईलवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असा स्टेटस ठेवला होता. हा स्टेटस पाहताच त्यांचे भाऊ नितीन पाटील यांनी तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधून पोलिसांना याविषयी माहिती दिली आणि भावाचा शोध घेण्याची विनंती केली.
घटना गांभीर्याने घेत ASI ठाकूर व पोलीस हवालदार देसाई यांनी तात्काळ नातेवाईकांकडून रोहिदास यांचा फोटो व्हॉट्सअॅपवर मागवून घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तीन स्वतंत्र पथके तैनात केली:
पथक १: ASI ठाकूर व पो.का. २७८ देसाई
पथक २: पो.ना. ४९१ कांबळे व पो.का. २५२५
पथक ३: पो.शि. इंजूळकर व होमगार्ड
तिन्ही पथकांनी गगनबावडा बस स्टँड, भुईबावडा घाट परिसर आणि सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत स्थानिक नागरिकांकडे चौकशी सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान गगनगिरी गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दरीच्या रेलिंगजवळ एक इसम तंद्रीत उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
ASI ठाकूर आणि पो.का. देसाई यांनी कोणतीही घाईगडबड न करता अतिशय कौशल्याने त्या इसमाजवळ गाठ मारली. त्याला विश्वासात घेऊन गोड बोलून त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव रोहिदास पाटील असल्याचे सांगितले. वाढत्या कर्जामुळे जीवन संपवण्यासाठी येथे आल्याची कबुली त्याने दिली.
पोलिसांनी घटनास्थळीच रोहिदास यांचे समुपदेशन करून त्यांचे मनपरिवर्तन केले आणि त्यांना सुरक्षित पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांच्या नातेवाईकांशी फोनवरून संवाद साधून देण्यात आला. पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे रोहिदास यांनी आत्महत्येचा निर्णय मागे घेतला असून, नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यांना सुखरूप ताब्यात दिले जाणार आहे. वेळच्या वेळी मिळालेल्या मदतीमुळे गगनबावडा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या