तासगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या लढ्याला तासगाव तालुका सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.याबाबत आज तासगाव तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तासगाव तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या निवेदनात चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,तसेच हैदराबाद,मुंबई आणि सातारा गॅझेटमधील नोंदींच्या आधारे तात्काळ आरक्षण लागू करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली.दरम्यान,शासनाच्या प्रतिनिधींनी तात्काळ उपोषणस्थळी जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करावी आणि त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी भूमिका सकल मराठा समाजाने मांडली.शासनाने मराठा समाजाच्या भावनांचा अंत पाहू नये; मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा,अन्यथा तासगाव तालुक्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला.तसेच,जरांगे पाटील यांच्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालया समोर मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी “एक मराठा, लाख मराठा” आणि “आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं”अशा घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला.तासगाव तहसीलदारांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.त्यामुळे आता शासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे तासगाव तालुक्यातील मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या