प्रतिष्ठा न्यूज
सांगली, ता.२४ : येथील श्री गुजराती सेवा समाज द्वारा संचालित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयात हिंदी पंधरवड्यानिमित्त आंतरराष्ट्रीय हिंदी काव्यप्रस्तुती व काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. देश-विदेशातील मान्यवर साहित्यिकांच्या कवितांचे काव्यसादरीकरण तसेच महाविद्यालयातील युवा कवयित्रींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम विशेष ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. संस्थेचे अध्यक्ष कांतीभाई वामजा, सचिव रमणिक दावडा व संचालक रितेश शेठ यांनी या अभिनव उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
स्वीडनस्थित कवी सुरेश पांडे, कुवेतस्थित कवयित्री संगीता चौबे ‘पंखुडी’, तसेच रशियन मानव्य विद्यापीठ, मॉस्को येथील प्रा. डॉ. इंदिरा गाजिएवा यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी व भाषाविज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय काव्यसादरीकरणात सहभाग घेतला. अलीना ज्य्वागिन्त्सेवा, व्हेरोनिका, मार्गारिटा एर्मालयुक, एलेना शाख, एलिजावेता गारेवा (मॉस्को, रशिया) यांनीही आपल्या कविता सादर केल्या. याशिवाय रेडिओ अँकर व कवयित्री अनुपमा अनुश्री (मध्य प्रदेश) आणि डॉ. अनिता पांडे (छत्तीसगड) यांनी आभासी माध्यमातून सहभाग नोंदविला.
या काव्यप्रस्तुतीतून सामाजिक, वैश्विक, भाषिक, निसर्गविषयक तसेच मानवी भावभावनांचे विविध पैलू प्रभावीपणे अभिव्यक्त झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सहभागामुळे महाविद्यालयाच्या हिंदीविषयक उपक्रमाला व्यापक साहित्यिक परिमाण प्राप्त झाले.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सामाजिक, वैश्विक, भाषिक, राजकीय तसेच हास्य-व्यंग्य अशा विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे :
- पदव्युत्तर विभाग : सोनाली चौधरी
- पदवी विभाग : सादिया मुजावर, सुहानी साळुंखे, उजमा पठाण
- बी.सी.ए. : श्रेयस शेटे, रायबा मुल्ला
- व्यवसाय अभ्यासक्रम : समृद्धी चव्हाण, वसुंधरा एहोळ्ळी, समृद्धी कुकडे, सना बेग, सिद्धी शिंदे
- कनिष्ठ विभाग : खुशनुमा पठाण
विजेत्यांना प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर म्हणाले, “आजच्या काळात हिंदी भाषेचे जागतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही हिंदीचा वापर वाढत असून विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच रोजगाराच्या विविध संधी प्राप्त करून घेण्यासाठी हिंदी भाषेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.”
प्रारंभी प्रा. डॉ. शोभा पवार-निंबाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हिंदी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण पाटील यांनी ‘हिंदी भाषेचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापक गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. वर्षा सुखदेव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. माधुरी कांबळे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या