प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रा. लि., नागेवाडी कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ व द्वितीय बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र (आप्पा) लाड, चेअरमन ऋषिकेश (दादा) लाड, युवा उद्योजक रोहन (दादा) लाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील यांनी स्व. संपतराव (नाना) माने यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच स्व. पतंगराव कदम व स्व. भारती (ताई) लाड यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना महेंद्र (आप्पा) लाड यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून कारखान्याची वाटचाल केली जाईल, तसेच इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली.परिसरातील संपूर्ण ऊस गाळप करण्यासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपला ऊस भारती शुगर्सकडेच गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
चेअरमन ऋषिकेश लाड यांनी वाढीव गाळप क्षमता, सहवीज निर्मिती तसेच भविष्यात डिस्टिलरी व इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त केला. या प्रकल्पांचा अधिकाधिक फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई पाटील यांनी कदम व लाड कुटुंबीयांनी शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याचे सांगून कारखान्याला गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या