प्रतिष्ठा न्यूज/ किरण कुंभार
तासगाव : अल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही दुष्काळसदृश परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत असताना, कोयना धरणातून वीज निर्मितीनंतर थेट अरबी समुद्रात जाणारे ३० टीएमसी पाणी वाचविण्याची गरज आहे. या पाण्याचा उपयोग पुढील वर्षापर्यंत करता यावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी केवळ नियमांचा आधार न घेता लोकांच्या हितासाठी मदतीची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.तासगाव तहसील कार्यालयात तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई,पाणीसाठा आणि पशुधनासाठी आवश्यक चारा यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे,पंचायत समितीच्या सभापती सौ अरुणा पाटील, उपसभापती सुखदेव पाटील, जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे, पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, प्रमोद शेंडगे, महेश पाटील, उमेश पाटील, ऋषिकेश बिरणे, माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
### पाणी वाचविणे आणि उपलब्ध साठ्याचे नियोजन गरजेचे..
संजयकाका पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकरी मोठ्या कष्टाने जगवलेल्या द्राक्षबागा, डाळिंबाच्या बागा आणि इतर फळबागा वाचविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्याचबरोबर पशुधनासाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता करणे हेही मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर पाणी वाचविणे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे आणि फळबागांचे संरक्षण करणे यासाठी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.मी आजच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सांगली येथे बैठक घेऊन आलो आहे. म्हैशाळ, ताकारी आणि टेंभू योजनांचे पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
### सौर, पवन व औष्णिक ऊर्जेचा पर्याय उपलब्ध
कोयनेतून वीज निर्मिती करून अरबी समुद्रात जाणाऱ्या पाण्याबाबत बोलताना संजयकाका पाटील म्हणाले की, विजेची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि औष्णिक ऊर्जेचा उपयोग करता येतो. मात्र, पाणी निर्माण करता येत नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन करून ते भविष्यासाठी राखीव ठेवण्याची गरज आहे. कोयनेचे ३० टीएमसी पाणी वाचविण्याबाबत मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
### अधिकाऱ्यांनी लोकांच्या हितासाठी काम करावे..
दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाताना प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे आहे.केवळ नियमांचा बडगा दाखवून किंवा सरकारची बाजू घेत वेळ मारून नेण्याऐवजी अधिकाऱ्यांनी लोकांच्या सोबत राहून मदतीची भूमिका घ्यावी. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हीही प्रशासनाच्या सोबत आहोत. सर्वांनी एकत्रितपणे उपाययोजना करून शेतकरी, पशुपालक आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले.
### तालुक्यातील पाणी व चारा परिस्थितीचा आढावा..
बैठकीच्या सुरुवातीला तासगाव तालुक्यातील तलावांमधील पाणीसाठ्याची माहिती घेण्यात आली. तसेच तालुक्यातील पशुधनाची संख्या, संभाव्य चारा टंचाई आणि जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. उपलब्ध तलावांमधील पाणीसाठा तालुक्यातील गावांना अवघ्या महिनाभरासाठी पुरेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
### शेतकरी आणि पशुपालकांच्या मदतीसाठी निवेदन..
सांगली जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाई आणि चारा टंचाईचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासन स्तरावरून लवकरात लवकर मदत मिळावी, तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेची प्रभावी आणि सक्षम अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार अतुल पाटोळे यांना देण्यात आले.निवेदनाद्वारे शेतकरी व पशुपालकांना आवश्यक मदत मिळावी,रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने तत्परतेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
### चौकट : दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार..
बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांनी तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.यावर संजयकाका पाटील म्हणाले की,आपण येथे चमकोगिरी किंवा स्टंटबाजी करण्यासाठी आलेलो नाही. तालुक्यातील परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. प्रशासनाकडून आवश्यक आकडेवारी व माहिती घेऊन लवकरच पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, त्यावेळी तासगाव-कवठेमहांकाळ भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जाईल.
### कोट : नियमांपेक्षा लोकहिताला प्राधान्य द्या..
"या भीषण परिस्थितीत अधिकाऱ्यांनी केवळ नियमावर बोट ठेवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करू नये.लोकांनी वर्षानुवर्षे कष्ट करून फळबागा जगवल्या आहेत. पशुपालकांच्या व्यथा वेगळ्या आहेत.लोकांच्या सोबत राहून अधिकाऱ्यांनी मदतीची भूमिका घ्यावी.लोकांचा उद्रेक झाला तर परिस्थिती कोणाच्या हातात राहणार नाही."
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या