विजयपूर : जिल्ह्यातील सौहार्द सहकारी संस्थांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे, प्रलंबित कर्जवसुलीची प्रकरणे मार्गी लावणे तसेच अंमलबजावणीची (अमलजारी) प्रकरणे निकाली काढण्यासाठी संस्थांना मदत करणे, हा विजयपूर सौहार्द सहकारी संस्थांच्या वक्कूटचा प्रमुख उद्देश आहे, असे वक्कूटचे अध्यक्ष तथा कर्नाटक राज्य सौहार्द संयुक्त सहकारी संघाचे संचालक संजय पाटील कनमडी यांनी सांगितले.
विजयपूर सौहार्द सहकारी संस्थांच्या वक्कूटचा प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
सौहार्द सहकारी संस्थांच्या कामकाजात कर्जवसुली हा महत्त्वाचा विषय असून, कर्जदारांकडून वेळेत कर्जाची परतफेड न झाल्यास सौहार्द सहकारी संघाचा आर्थिक व्यवहारांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कर्जवसुलीशी संबंधित प्रकरणे कायदेशीर प्रक्रियेत दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत, यासाठी संघाच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सौहार्द सहकारी संस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी वक्कूटच्या माध्यमातून समन्वय साधण्यात येईल. संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी वक्कूट समोर मांडून त्यावर सामूहिक पातळीवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यामुळे सहकारी संस्थांचे कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
सहकार चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन
सौहार्द सहकारी संस्था या सहकार चळवळीचा महत्त्वाचा भाग आहेत. संस्थांमधील समस्या सोडवून त्यांचे आर्थिक व्यवहार अधिक सक्षम करण्यासोबतच सभासदांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सर्व प्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करून सौहार्द सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन वक्कूटचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कवटगी यांनी केले.
बैठकीच्या प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कवटगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संघाचे संचालक अरुण मठ, आर. डी. कुलकर्णी, चंद्रशेखर पाटील, सिद्धू मल्लिकार्जुनमठ, दिपक शिंत्रे, परशुराम चिंचली तसेच सौहार्द विकास अधिकारी बसवराज उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध सौहार्द सहकारी संस्थांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.
प्रतिनिधींनी मांडल्या अडचणी
बैठकीदरम्यान विविध सौहार्द सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी कर्जवसुली, दावा प्रकरणे, अंमलबजावणीची प्रकरणे आणि संस्थांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आवश्यक सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा प्रतिनिधींनी व्यक्त केली.
बैठकीचे सूत्रसंचालन यमनप्पा सातिहाळ यांनी केले. बैठकीतील विषयांची मांडणी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंपनगौडा पाटील यांनी केली. संचालक अरुण वारद यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या