कोल्हापूर : येथील निहारिका पार्क, (साई मंदिर जवळ) येथे श्री गणेशोत्सव व गौरी सणाच्या निमित्ताने महिलांसाठी पारंपरिक 'फुगड्यां'च्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौरी-गणपतीच्या भक्तीमय वातावरणात निहारिका पार्क परिसरातील महिलांनी एकत्र येत पारंपरिक गाण्यांच्या तालावर फुगड्यांचा फेर धरत सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
'गौरी गणपती आला, सोन्याच्या पायाने आला...' आणि 'पहिली फुगडी गं...' अशा एकापेक्षा एक सरस लोकगीतांच्या गजरात महिलांनी झिम्मा, कमळ फुगडी, साळुंकी आणि काटवट फुगडी यांसारखे विविध पारंपरिक खेळ सादर केले. लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच महिलांनी या खेळात मोठ्या हिरिरीने भाग घेतला होता.
धावपळीच्या आणि आधुनिक युगातही निहारिका पार्क परिसरातील महिलांनी आपली संस्कृती व परंपरा जपण्याचा केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला. खेळ रंगल्यानंतर उपस्थितांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे निहारिका पार्कमधील गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या