प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर होत असताना तासगाव तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात प्रत्यक्षात पावसाचे प्रमाण अपुरे असताना शासकीय नोंदींमध्ये ९१.४० टक्के पर्जन्यमान दाखविण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.या पर्जन्यमानाच्या आकडेवारीची शेतकरी हितार्थ कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.तासगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेतीच्या पिकांवर परिणाम झाला असून, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.अशा परिस्थितीत दुष्काळी यादीत तालुक्याचे नाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
### पर्जन्यमानाच्या आकडेवारीची चौकशी करा..
९१.४० टक्के पर्जन्यमानाची नोंद कोणत्या आधारावर करण्यात आली,याची प्रशासनाने सखोल तपासणी करावी.पावसाची शासकीय नोंद आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाणवणारी परिस्थिती यामध्ये तफावत असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करावी,अशी मागणी होत आहे.पर्जन्यमापन केंद्रांवरील नोंदी,तालुक्यातील पावसाचे प्रत्यक्ष प्रमाण, पिकांची स्थिती आणि पाणी उपलब्धतेचा आढावा घेऊन दुष्काळी परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागू नये,यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
### शेतकऱ्यांमध्ये संताप; आंदोलनाचे संकेत...
दुष्काळी यादीत तासगाव तालुक्याचा समावेश न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन पर्जन्यमानाच्या नोंदीची चौकशी करावी आणि तालुक्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी काळात या प्रश्नाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन व प्रशासन आता कोणती भूमिका घेते,याकडे तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या