सांगली, दि. २० : यावर्षी एल-निनो परिस्थितीच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाल्याने जिल्ह्यातील विविध मध्यम, लघु प्रकल्प तसेच इतर जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. कृष्णा नदीतील पाणीपातळीतही घट होत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात न करता महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.
दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी कृष्णा नदीवरील को. प. बंधारा, सांगली येथे पाण्याची पातळी ५३१.६२० मीटर (६ फूट ३ इंच) इतकी होती. सिंचन व बिगरसिंचन कारणांसाठी नदीतून पाणी उपसा सुरू असल्याने नदीच्या पाणीपातळीत घट होत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कोयना व वारणा धरणातून सध्या सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सध्या गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू असून, परंपरेनुसार गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात केले जाते. मात्र, सध्या नदीतील पाणीपातळी कमी होत असल्याने गणेशमूर्तींवरील रासायनिक रंगांमुळे उपलब्ध पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. तसेच पाणीपातळी आणखी कमी झाल्यास विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती पाण्याबाहेर येण्याची (उघड्या पडण्याची) शक्यताही आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन न करता महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या