सांगली, दि १८ : महापूर येण्याची कारणे, त्यामुळे होणारे नुकसान आणि महापूर रोखण्यासाठीचे उपाय याबाबत सविस्तर माहिती असलेल्या 'महापुराशी दोन हात' या पुस्तकाचे दि. २१ सप्टेंबर रोजी(सोमवारी) सायंकाळी प्रकाशन होणार आहे. सांगलीत श्री कृष्णा नदीच्या माई घाटावर (लोकनेते वसंतरावदादा पाटील यांच्या स्मारकाच्या लगत) सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम आणि कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांच्या उपस्थितीत तसेच आमदार अरुणअण्णा लाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा या नद्यांच्या काठावरील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा सतत तडाखा बसतो. या महापुराची कारणे व महापूर रोखण्याचे उपाय याबाबत शास्त्रीय माहितीसह विश्लेषण असलेल्या या पुस्तकाचे लेखन सांगलीच्या जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अभियंता (कै.) विजयकुमार दिवाण आणि इंजिनिअर प्रभाकर केंगार यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
कृष्णा महापूर नियंत्रण नागरि कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अभिषेक दिवाण, समन्वयक सर्जेराव पाटील, पुस्तकाचे लेखक प्रभाकर केंगार आणि संपादक चिंतामणी सहस्रबुद्धे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या