प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगाव तालुक्यातील पेड लघु पाटबंधारे तलावात आठ दिवसांच्या आत पाणी सोडून तलाव भरून घ्यावा; अन्यथा समस्त शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा पेड येथील शेतकरी व माजी संजय गांधी समिती सदस्य बाबासाहेब आप्पासो पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. पेड तलावातील पाणीसाठा मृतसाठ्यापर्यंत खाली गेल्याने परिसरात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस न झाल्याने ज्वारी, कडधान्ये यांसह खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. पिके ऐन भरात असताना पावसाने पूर्ण ओढ दिल्याने पिके वाळून खाली पडू लागली आहेत. द्राक्षबागा, फळबागा, मका आणि इतर बागायती पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसाअभावी जमिनीतील भूजलपातळी दिवसेंदिवस खालावत असून, विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत. परिस्थिती अशीच राहिल्यास पशुधन वाचविणे तसेच बागायती पिके टिकविणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण होणार आहे. त्यामुळे भविष्यात उदरनिर्वाहासाठी गाव सोडून स्थलांतर करण्याची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पाटबंधारे विभागाने विसापूर-भालेकडा-पुणदी उपसा योजनेतून पेड तलावात पाणी सोडले होते. मात्र तलावातील शिल्लक पाणी आणि सोडण्यात आलेले पाणी पेड ओढ्याद्वारे गौरगाव, मोराळे, मांजर्डे हद्दीतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सोडण्यात आल्याने तलावातील पाणीसाठा आता मृतसाठ्यापर्यंत खाली गेला आहे.
पेड तलावावर पेड गाव, पेड वस्तीभाग पाणीपुरवठा योजना, नरसिंगपूर पाणी योजना तसेच किल्लापूर पाणीपुरवठा विहिरी अवलंबून आहेत. तलावात तातडीने पाणी सोडले नाही तर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाव असूनही पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
आठ दिवसांच्या आत पेड तलावात पाणी सोडून परिसरातील पाणीटंचाई व दुष्काळसदृश्य परिस्थिती दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बाबासाहेब पाटील यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या