सावळज : शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळ, खुजगाव व रोटरी क्लब ऑफ मिडटाउन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी खुजगाव येथे रक्तदान, मॅमोग्राफी व रेटिनोपॅथी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये ४० नागरिकांनी रक्तदान केले. तसेच ३१ महिलांची मॅमोग्राफी तपासणी करण्यात आली. याशिवाय ७० नागरिकांची रेटिनोपॅथी तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच डोळ्यांशी संबंधित समस्या असलेल्या नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व तज्ज्ञांचा सल्ला देण्यात आला.
महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व्हावे, तसेच नागरिकांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदानातून गरजू रुग्णांना मदत मिळावी, या सामाजिक भावनेतून नागरिकांनी रक्तदान केले.
या उपक्रमासाठी शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळ, रोटरी क्लब ऑफ मिडटाउन सांगली, श्री गणेश मित्र मंडळ, बालगणेश मित्र मंडळ, मोरया फ्रेंड्स सर्कल, शिवगर्जना मित्र मंडळ व समर्थ नगर आदींचे सहकार्य लाभले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्ते, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रक्तदाते तसेच तपासणीसाठी उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या