प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. यडियुरप्पा यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पक्षाच्या संघटनवाढीसाठी समर्पित केले असून, दक्षिण भारतात भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशा ज्येष्ठ नेत्यावर आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आधारहीन टीका करणे थांबवावे, अशी मागणी विजयपूर नगरसभेचे माजी अध्यक्ष परशुरामसिंग रजपूत यांनी केली आहे. यत्नाळ यांच्या वक्तव्यांमुळे यडियुरप्पा यांच्या व्यक्तिमत्त्वाला कोणताही धक्का पोहोचणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रजपूत यांनी यडियुरप्पा यांच्या राजकीय योगदानाचा उल्लेख करत यत्नाळ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदविला. यडियुरप्पा हे जनमानसातील लोकप्रिय नेते असून, राज्यासह देशभरात त्यांची स्वतंत्र ओळख आहे. कृषी अर्थसंकल्पासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आले. त्यामुळे त्यांच्या योगदानावर टीका करण्यापूर्वी यत्नाळ यांनी आत्मपरीक्षण करावे, असे रजपूत यांनी म्हटले आहे.
### गुरू मानणाऱ्यांकडूनच टीका; रजपूत यांचा सवाल..
यडियुरप्पा यांनी यत्नाळ यांना अनेकदा दुखावले गेले असतानाही मुलाप्रमाणे मानले आणि पुन्हा पक्षात सामावून घेतले. त्यावेळी यत्नाळ यांनीच यडियुरप्पा हे आपले गुरू असल्याचे म्हटले होते. मात्र, आता त्यांच्यावरच टीका करणे आणि ‘त्यांच्या कारमध्ये डिझेल भरून देणारा मीच होतो,’ अशा प्रकारची विधाने करणे ही बाब राजकीय संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशी टीका रजपूत यांनी केली.
ज्येष्ठ नेत्यांनी पक्षवाढीसाठी दिलेल्या योगदानाचा आदर करणे आवश्यक आहे. वैचारिक मतभेद असले तरी ते व्यक्त करताना राजकीय शिष्टाचार आणि संयम पाळला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
### विजयेंद्र यांच्या नेतृत्वावर विश्वास
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र हे युवा नेतृत्व असून, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी उत्साहाने काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची संघटनात्मक बांधणी सुरू असून, आगामी काळात पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास रजपूत यांनी व्यक्त केला.यत्नाळ हे भाजपमध्येच राहण्याची इच्छा बाळगून असल्याने पुन्हा पक्षात प्रवेश मिळविण्यासाठी विविध प्रकारचे राजकीय नाट्य करीत असल्याचा आरोपही रजपूत यांनी केला. या आरोपावर यत्नाळ यांची भूमिका समोर आलेली नाही.
### ‘हिंदुत्वाचा धडा यत्नाळांकडून घेण्याची गरज नाही’
‘हिंदुत्वाचा धडा यत्नाळांकडून शिकण्याची गरज नाही. मी स्वतः हिंदुत्ववादी आहे. मात्र, इतर धर्मीयांची निंदा करण्यास हिंदू संस्कृती परवानगी देत नाही,’ असे रजपूत यांनी पत्रकात नमूद केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडील वक्तव्याचा संदर्भ देत रजपूत यांनी भारताची हिंदुत्ववादी संस्कृती ही विविधतेचा स्वीकार आणि सर्व धर्मीयांशी बंधुभाव राखण्यावर आधारित असल्याचे सांगितले.या मूल्यांच्या विरोधात वर्तन करणाऱ्या यत्नाळांना हिंदू नेता कसे म्हणता येईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यडियुरप्पा आणि विजयेंद्र यांच्यावरील टीका थांबवून पक्षातील अंतर्गत मतभेद संवादातून सोडवावेत, असे आवाहन परशुरामसिंग रजपूत यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या