प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेली सहाय्यभूत साधने सहज उपलब्ध व्हावीत, तसेच त्यांना अधिक स्वावलंबी जीवन जगता यावे, या उद्देशाने तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तासगाव येथे झालेल्या शिबिराला दिव्यांग लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ८० हून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.आर. आर. (आबा) युवा प्रतिष्ठान व एस. आर. ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा परिषद सांगलीच्या सहकार्याने तसेच अलिम्को संचलित एस. आर. ट्रस्टच्या माध्यमातून ही शिबिरे राबविण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या शारीरिक गरजेनुसार कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स तसेच विविध प्रकारच्या सहाय्यभूत उपकरणांसाठी आवश्यक मोजमाप घेण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया या माध्यमातून राबविण्यात येत आहे.दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी कमी व्हाव्यात, हालचाल व इतर आवश्यक कामांमध्ये सुलभता निर्माण व्हावी आणि उपलब्ध साधनांच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी होता यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
यावेळी आमदार रोहित पाटील म्हणाले, “दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेली सहाय्यभूत साधने वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ही शिबिरे घेतली जात असून, गरजू लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”
जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरे
दिव्यांग लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.
कवठेमहांकाळ – २२ सप्टेंबर : जिल्हा परिषद शाळा क्रमांक १
जत – २३ सप्टेंबर : पंचायत समिती सभागृह / तहसील कार्यालय तलाठी हॉल
आटपाडी – २८ सप्टेंबर : पंचायत समिती सभागृह
खानापूर – २९ सप्टेंबर : पंचायत समिती आवार
कडेगाव – ३० सप्टेंबर : वांगी प्राथमिक आरोग्य केंद्र
शिराळा – १ ऑक्टोबर : पंचायत समिती सभागृह
वाळवा – ५ ऑक्टोबर : ईश्वरपूर पंचायत समिती हॉल
पलूस – ६ ऑक्टोबर : ग्रामीण रुग्णालय
मिरज – ७ ऑक्टोबर : पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत
सर्व शिबिरांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी आहे. संबंधित तालुक्यातील गरजू दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तासगावातील शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता जिल्ह्यातील आगामी शिबिरांमध्येही मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या