सांगली प्रतिनिधी : जायंटस वेलफेअर फाउंडेशनतर्फे दरवर्षी १७ ते २३ सप्टेंबरदरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या जायंटस सप्ताहानिमित्त जायंटस ग्रुप ऑफ सांगली पर्लतर्फे यंदा तब्बल १४ सामाजिक, आरोग्यविषयक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमांतून करण्यात आला.
जायंटस सप्ताहाची सुरुवात पद्मश्री नाना चुडासामा आणि उद्योजक काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सप्ताहभर विविध ठिकाणी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सांगली येथील बेघर निवास केंद्राला २५ किलो साखर व तूरडाळ देण्यात आली. तसेच विनायक राजाराम लिमये सुवर्ण मंदिर वृद्धाश्रमातील सुमारे ८० वृद्धांना कपड्याचे व अंगाचे साबण देण्यात आले. यावेळी ग्रुपतर्फे आरतीही घेण्यात आली.
एमआयडीसी, सांगली येथील शारदा इलेक्ट्रिकल संस्थेतील ४० कामगारांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉक्टर मुग्धा उदगावकर यांनी कामाच्या ठिकाणी घ्यावयाची काळजी, आरोग्याची निगा आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
कोहम पुनर्वसन संस्था, धामणी येथे फाव्हलर बेड व दोन गाद्या देण्यात आल्या. तसेच तेथील व्यक्तींना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. ग्रुपतर्फे गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करून उत्कृष्ट सजावटीसाठी तीन क्रमांक काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
डॉ. श्रीनिकेतन काळे यांच्या होरेझान हॉस्पिटलमध्ये ४० महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. यशवंतनगर येथील भगिनी निवेदिता केंद्रातील विशेष मुलींसाठी आर्थिक मदत देण्यात आली. राजवाड्याजवळील पांजरपोळ येथे जनावरांसाठी चारा देण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रविवार बाजार परिसरात सुमारे १०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला रोप देऊन ते जगविण्याचे आवाहन करण्यात आले.
दिलीप शिंदे यांच्या संवेदना केंद्राला १५ किलो तांदूळ आणि ३० किलो साखर देण्यात आली. गणपती विसर्जनाच्या वेळी ग्रुपमधील महिलांनी विसर्जन कुंडाजवळ उपस्थित राहून नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले.
वंडर किड्स शाळेत गणपती चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उत्कृष्ट चित्रांना क्रमांक देऊन विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. महिलांसाठी योगशिक्षिका शैला बिजरगी यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. त्यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती देत काही सोपी योगासनेही शिकवली.
या सर्व उपक्रमांच्या नियोजनासाठी कोऑर्डिनेटर जया जोशी, अध्यक्ष रंजना साठे, माजी अध्यक्ष वैशाली कुलकर्णी, नीलिमा काळे, सरिता शेटे, अनुराधा डुबल, कांचन पाटील, अश्विनी पाटील, सुप्रिया हाडदर, शैला बिजरगी यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमांसाठी आवश्यक आर्थिक नियोजनही करण्यात आले.
यावेळी आशा पाटील, अक्षदा यादव, अनिता पवार यांच्यासह ग्रुपचे इतर सदस्य उपस्थित होते. जायंटस ग्रुप ऑफ सांगली पर्लच्या विविध उपक्रमांना संबंधित संस्था व नागरिकांनी सहकार्य केले. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात सातत्याने उपक्रम राबविण्याचा ग्रुपचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या