तासगाव : विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेतील गुणांपुरते मर्यादित न राहता शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, मेहनत आणि सामाजिक बांधिलकी जोपासत चांगला माणूस होण्याचे ध्येय ठेवावे. डॉ. बापूजी साळुंखे यांनी उभारलेली शिक्षणाची चळवळ ही केवळ संस्था उभारण्यापुरती मर्यादित नव्हती, तर समाज घडविण्याची चळवळ होती. त्यांच्या विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणातून समाजासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन साहित्यिक सुनील जवंजाळ यांनी केले.
तासगाव येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयांतर्गत आंतरवासिता शाळा श्री सिद्धनाथ हायस्कूल, आरवडे येथे भाषा मंडळाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. डी. चव्हाण होते.
यावेळी बोलताना सुनील जवंजाळ यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील यश-अपयशाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. अपयश आले म्हणून खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाणे आवश्यक आहे. मोठी स्वप्ने पाहताना आपल्या कुटुंबाचा, शाळेचा आणि समाजाचा अभिमान वाढविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा त्यांनी दिलेला विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा केवळ गौरव न करता ते आपल्या दैनंदिन आचरणात आणावेत, असे आवाहनही जवंजाळ यांनी केले.
यावेळी त्यांच्या विविध अनुभवांवर आधारित उदाहरणे, विनोदी शैलीतील कविता आणि प्रभावी वक्तृत्वातून विद्यार्थ्यांना हसवत-हसवत अंतर्मुख करण्यात आले. त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विराज सुधीर साळुंखे यांचा तसेच स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल अथर्व पंकज पाटोळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक पी. डी. चव्हाण यांनी, बापूजी साळुंखे यांची तत्त्वे जो विद्यार्थी आपल्या आचरणात आणतो, तो जीवनात निश्चितच यशस्वी होतो, असे मत व्यक्त केले.
यावेळी एस. बी. कोळी, क्रीडाशिक्षक एस. एस. शिंदे, बी. एस. पडियाल, ज्येष्ठ शिक्षिका के. एस. जगदाळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी दहिवडकर यांनी केले, तर आभार मोनिका जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक पी. डी. चव्हाण, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. बी. म्हस्के, आंतरवासिता विभागप्रमुख डॉ. ए. एस. चिखलीकर, गटमार्गदर्शक प्रा. पी. एस. शेंडगे, बी. एड. प्रशिक्षणार्थी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या