प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२३ : महापुराची कारणे आणि तो रोखण्यासाठीचे उपाय योजना यांची माहिती देणाऱ्या 'महापुराशी दोन हात' या पुस्तकाचे प्रकाशन येथे कृष्णा नदी काठावर झाले. सोमवारी संध्याकाळच्या वेळी पावसाची सतत रिमझिम सुरू असतानाच पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नागरिकांच्या उपस्थितीत झाला.
कृष्णा, वारणा, पंचगंगा आणि दूधगंगा या नद्यांच्या काठावरील सांगली, कोल्हापूर तसेच सातारा जिल्ह्यातील फार मोठ्या भागाला गेली काही वर्षे पावसाळ्यात महापुराचा तडाखा बसतो आहे. वारंवार येणारे हे महापूर कशामुळे नेमके येतात, त्यासाठीची कारणे कोणती आणि महापूर रोखण्यासाठीचे उपाय कोणते केले पाहिजेत या संदर्भात सांगलीच्या जलसंपदा विभागातील निवृत्त अभियंता (कै. )विजयकुमार दिवाण आणि अभियंता प्रभाकर केंगार यांनी हे पुस्तक शास्त्रीय माहितीसह लिहिले आहे. ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या पुस्तकास प्रस्तावना लिहिली आहे.
लोकनेते वसंतरावदादा पाटील यांच्या समाधी लगत कृष्णा नदी काठावर सोमवारी सायंकाळी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यावेळी जलसंपदा विभागातील निवृत्त अधीक्षक अभियंता शांतिनाथ पाटील, पुस्तकाचे लेखक प्रभाकर केंगार,कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे अध्यक्ष डॉ. अभिषेक दिवाण, महापूर नियंत्रण समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, चिंतामणी सहस्रबुद्धे, माजी महापौर प्रा. नितीन सावगावे, सुहास पाटील, पुस्तकाचे मुद्रक पत्रकार जगन्नाथ पाटील आणि मारुती नवलाई यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
शांतिनाथ पाटील, प्रभाकर केंगार, सर्जेराव पाटील, चिंतामणी सहस्रबुद्धे यांनी महापूर तसेच पुस्तकाविषयी माहिती दिली. यावेळी कृष्णामाई जलतरण संस्थेचे गोपाळ मर्दा, पत्रकार विजय पडियार, प्रा. डॉ. संजय ठिगळे, आनंदराव कोरे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या