प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:“लोग कहते है मैं शराबी हूं…”, “बाबुराव आला, पोरी जरा जपून दांडा धर…” यांसारख्या अश्लील आणि महिलांचा अवमान करणाऱ्या गाण्यांचा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत सर्रास वापर होत असेल,तर हा उत्सव नेमका कोणत्या दिशेने चालला आहे, असा संतप्त सवाल आता समाजातून उपस्थित होणे गरजेचे आहे.विघ्नहर्त्या गणरायाच्या नावाने निघणाऱ्या मिरवणुकीत भक्ती,संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाऐवजी अश्लील गाण्यांचा धडाका सुरू असेल,तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूळ संकल्पनेलाच आपण विसरत चाललो आहोत का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे केवळ मनोरंजनाचा हेतू ठेवला नव्हता.समाज एकत्र यावा,राष्ट्रीय भावना जागृत व्हावी, सामाजिक एकोपा निर्माण व्हावा आणि जनजागृतीला व्यासपीठ मिळावे, हा त्यामागील व्यापक विचार होता.मात्र आज काही ठिकाणी याच उत्सवाचे स्वरूप मोठमोठे डीजे,कर्णकर्कश आवाज, अश्लील गाणी आणि बेभान नृत्य यापुरते मर्यादित होताना दिसत आहे.
छत्रपतींच्या विचारांचा विसर पडतोय का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना देव,देश,धर्म, स्वाभिमान आणि रयतेच्या सन्मानासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले.स्वराज्याच्या लढ्यात धर्मरक्षणाबरोबरच सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेला आणि महिलांच्या सन्मानाला महत्त्वाचे स्थान दिले.छत्रपती संभाजी महाराजांनीही स्वराज्य, धर्म आणि स्वाभिमानासाठी असामान्य त्याग केला.अमानुष छळ सहन करूनही त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही.ज्या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यागाची आणि स्वाभिमानाची परंपरा आहे,त्याच महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत महिलांचा अवमान करणारी गाणी वाजवली जात असतील,तर हा विरोधाभास निश्चितच विचार करायला लावणारा आहे.छत्रपतींच्या नावाचा जयघोष करण्याबरोबरच त्यांच्या आचरणातील शौर्य,संयम, स्त्रीसन्मान, स्वाभिमान आणि समाजहित आत्मसात करण्याची गरज आहे.
गणरायासमोर महिलांचा अवमान का?
गणरायासमोर महिलांचा अवमान करणारी गाणी वाजवून आपण कोणती संस्कृती पुढच्या पिढीला देत आहोत? हा प्रश्न प्रत्येक गणेशभक्ताने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. उत्सव साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे;मात्र उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक वातावरणाची प्रतिष्ठा,महिलांचा सन्मान आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांची पायमल्ली होऊ नये, ही जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण ठेवणाऱ्या समाजाने उत्सवाच्या माध्यमातूनही सन्मान,शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देणे अपेक्षित आहे. केवळ घोषणांमध्ये छत्रपती आणि प्रत्यक्ष कृतीत विकृती,अशी विसंगती समाजासाठी निश्चितच चिंतेची बाब ठरू शकते.
*तरुणाईच्या उत्साहाला विधायक दिशा हवी*
आजची तरुण पिढी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सवात सहभागी होते.हाच उत्साह सामाजिक उपक्रम,रक्तदान,स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक मदत आणि सामाजिक प्रबोधनासाठी वापरला तर गणेशोत्सव समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो.
मात्र उत्सव म्हणजे केवळ आवाज,नाच आणि अश्लील मनोरंजन,अशी व्याख्या तयार होत असेल तर पुढील पिढीसमोर आपण कोणता आदर्श ठेवत आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला शिस्तबद्ध समाज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानातून जपलेला स्वाभिमान यांचा वारसा केवळ जयघोषापुरता न राहता आपल्या आचरणातही दिसायला हवा.
*मंडळांनी स्वतःहून आचारसंहिता ठरवावी*
‘देव, देश आणि धर्म’ या व्यापक भावनेपासून उत्सव दूर जात असेल, तर दोष केवळ तरुणांचा नाही; त्यांना दिशा देण्याची जबाबदारी समाजातील ज्येष्ठ, पालक, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि जबाबदार नागरिकांचीही आहे.गणेशोत्सवाची संस्कृती विकृती होऊ नये,यासाठी गणेश मंडळांनी स्वतःहून आचारसंहिता ठरवणे गरजेचे आहे. महिलांचा सन्मान राखणारी, समाजाला सकारात्मक संदेश देणारी आणि गणरायाच्या भक्तीला साजेशी गाणी व उपक्रम मिरवणुकीचा भाग झाले पाहिजेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वाभिमान व धर्मासाठी दिलेला त्याग हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे.त्या परंपरेचा वारसा पुढे नेताना गणेशोत्सवातही शिस्त, संस्कार, सन्मान आणि सामाजिक बांधिलकी जपणे हीच खरी आदरांजली ठरेल.उद्या आपल्या मुलांनीच विचारले, “गणपती बाप्पाच्या उत्सवात आपण नेमके काय शिकवले?” तर त्याचे उत्तर देताना अभिमान वाटेल, असा उत्सव साजरा करण्याची गरज आहे.गणरायाचा उत्सव हा बेभानपणाचा नव्हे, तर भक्ती, संस्कार,शौर्य, स्वाभिमान, एकोपा आणि सामाजिक जागृतीचा उत्सव आहे. ही जाणीव प्रत्येक गणेश मंडळाने आणि प्रत्येक गणेशभक्ताने ठेवण्याची गरज आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या