सांगली, दि. २४ : राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने विजय नगर चौक परिसरात नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले. युवकांना व्यसनांपासून दूर ठेवणे, व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि नशामुक्त, सशक्त भारताच्या निर्मितीत युवकांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
अंमली पदार्थ व विविध व्यसनांविरोधात जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी उभारली. “नशेला नकार, जीवनाला होकार”, “एक हात, एक संकल्प; एक साखळी, एक संदेश” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यानंतर जनजागृतीपर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ‘मी नाही, तर तू’ हे ब्रीद अधोरेखित करत युवकांनी व्यसनांपासून दूर राहून क्रीडा, शिक्षण व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. “व्यसनाला नाही, क्रीडेला हो म्हणा” असा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी “माझे शरीर, माझे मन, माझा देश — नशामुक्त भारत, सशक्त भारत!” असा सामूहिक संकल्प करण्यात आला. तसेच निबंध लेखन व रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोर चंदूरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अबोली पिंजारकर, विद्यार्थी प्रमुख मांतेश लोखंडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी अदिती शिंदेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने आयोजित या विविध उपक्रमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारताच्या संकल्पनेला बळ देत ‘नशामुक्त भारत, सशक्त भारत’चा प्रभावी संदेश देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या