मिरज : हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने मिरज येथे उभारण्यात येणाऱ्या मानाच्या कमानीचे उद्घाटन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे व करण जामदार यांच्या हस्ते नारळ वाढवून व फित कापून उत्साहात करण्यात आले.
सदर कमानीवर नरसिंह अवतार ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. सदर कमान 60 फूट उंच असून भव्य दिव्य आहे.
गेल्या ४० वर्षांपासून दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात ही पहिली मानाची कमान उभारण्याची परंपरा सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात मिरज शहरात येणाऱ्या गणेश मंडळांचे या कमानीद्वारे स्वागत करण्यात येते. त्यामुळे ही कमान गणेशोत्सवातील एक महत्त्वाची आणि पारंपरिक ओळख बनली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळे, कार्यकर्ते व भाविकांचे या कमानीद्वारे स्वागत केले जाते. कमान उभी करून मंडळाचे स्वागत करणारी पहिली मानाची हिंदू एकता आंदोलन संघटनेची कमान ओळखली जाते. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली आहे. सदर कमान उभा करण्यासाठी मिरज येथील हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे व पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले.
यावेळी नगरसेवक करण जामदार, दत्तात्रय भोकरे, प्रकाश भोसले, कृष्णा नायडू, अनिरुद्ध कुंभार, प्रकाश चव्हाण, गजानन माने, अवधूत जाधव, विष्णु पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेश मंडळांचे पदाधिकारी व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या